नागपुरातील टेकडी उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू

28

नागपूर : नागपूर शहरातील प्रसिद्ध टेकडी उड्डाणपूल पाडण्याचे काम आजपासून सुरू झाले आहे. मानस चौकाच्या दिशेने उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरु केले जाणार असून पुढील पंधरा दिवसात संपूर्ण उड्डाणपूल पाडण्याचे लक्ष्य आहे.

८१२ मीटर लांब आणि १०.५ मीटर रुंद असलेला हा उड्डाणपूल २००८ मध्ये ११६.२३ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला होता. उड्डाणपुलाखाली एकूण 175 दुकाने बांधण्यात आली होती, परंतु जयस्तंभ चौक परिसरातील वाहतूकीची रोज उद्भवणारी कोंडी लक्षात घेता व वाहतुक समस्या सोडवण्यासाठी जयस्तंभ चौकाच्या आजूबाजूच्या रस्त्याच्या परिसरात बदल करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार लोहा पुलाजवळ रेल्वे अंडर ब्रिज तर किंग्जवे येथे वाय शेप उड्डाणपूल प्रस्तावित आहे. येथील उड्डाणपूल पाडून तेथे पुन्हा रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

व्हीएनआयटीच्या अहवालानुसार, 2018 मध्ये हा कामाचा अहवाल सादर करण्यात आला आणि हे संपूर्ण काम महा मेट्रोकडे डिपॉझिट वर्क बेसिसवर सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर किंग्सवे फ्लायओव्हर आणि आरयूबी बांधण्यात आले. रेल्वे स्थानकासमोरील सध्या असलेला उड्डाणपूल पाडून जयस्तंभ व मानस चौकाला जोडणारा सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करणे आवश्यक आहे. त्यामुळे टेकडी उड्डाणपूल पाडण्यात येत आहे.

उड्डाणपूलखाली काम करणाऱ्या दुकानदारांना सामावून घेण्यासाठी महामेट्रोने 111 दुकाने बांधली असून ती दुकाने वाटप करण्यासाठी महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. दुकानदारांनी कायदेशीर हस्तक्षेपाची मागणी केली होती. यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब झाला, मात्र, आता उड्डाणपुलाखालील दुकानदारांनी तत्परता दाखविल्यानंतर महापालिकेने उड्डाणपूल पाडण्याची तयारी दर्शविली.

१५ दिवसांत पूल जमीनदोस्त करणार 

मेट्रोचे प्रकल्प (संचालक) राजीव त्यागी यांनी सांगितले की, उड्डाणपूल पाडण्याचे काम एनसीसीकडून मेसर्स मॅटद्वारे केले जाईल. टेकडी उड्डाणपूल पाडण्याची प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण केली जाणार आहे.

उड्डाणपूल पाडून सहा पदरी रस्ता होणार

उड्डाणपूल पाडण्याचे काम कोणत्याही त्रुटी शिवाय व्हावे, या उद्देशाने ती जबाबदारी महामेट्रोकडे सोपवण्यात आली आहे. भविष्यात या ठिकाणी मोठा आणि प्रशस्त उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. उड्डाणपूल पाडून हा रस्ता सहा पदरी होणार आहे. तसेच रेल्वे स्थानकावर येणाऱ्यांसाठी पार्किंगची सोय आणि 200 दुकानांचे शॉपिंग कॉम्प्लेक्स इथे बनणार आहे.

Google search engine