सलग 101 तास करणार स्वयंपाक, सामान पुढील वर्षी जहाजाने पाठवणार.
नागपूर (Nagpur) : अन्न आणि खाद्यपदार्थाच्या क्षेत्रातील विक्रमवीर ख्यातनाम शेफ विष्णू मनोहर सलग 101 तास कुकींगचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहेत. अमेरिकेच्या सॅनफ्रान्सिस्को (Sanfrancisco) येथे ते हा विक्रम करतील. यासाठी लागणारी सामग्री ते जून 2024 च्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेला पाठवणार आहेत.
शाकाहाराचे महत्व वाढावे, मराठी रेसिपी अमेरिकनांसह परदेशींना कळाव्या यासाठी हा वर्ल्ड रेकॉर्ड अमेरिकन मराठी जनांना समर्पीत करण्यात येणार आहे. यातून मिळणारा पैसा महाराष्ट्रातील समर्पीत भावनेने काम करणाऱ्या विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था व संघटनांना देण्यात येईल, अशी माहिती विष्णू मनोहर यांनी दिली. या विश्व विक्रमांतर्गत 1500 शाकाहारी पदार्थ तयार करण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले.
विशेष म्हणजे विष्णू मनोहर यांनी यापूर्वी 2018 मध्ये सलग 53 तासांचा नॉनस्टॉप कुकींगचा विक्रम केला होता. त्यांनी याद्वारे बेन्जुमीन पेरी यांचा सलग 40 तास कुकींग करण्याचा विक्रम मोडला. मध्य प्रदेशाच्या रिवा येथील लता टंडन यांनी सलग 87 तासांचा विक्रम केला होता. त्यानंतर केन्याच्या माहीया मोहंमद यांनी सलग 92 तास 11 मिनिटांचा रेकॉर्ड करीत रिवा टंडन यांचा रेकॉर्ड मोडला.
आता विष्णू मनोहर सलग 101 तासांचा नवा विक्रम करण्याच्या तयारीला लागलेत. यासाठी लागणारे स्वयंपाकाचे साहित्य ते 2-3 महिने अगोदर जहाजाने अमेरिकेला पाठवणार आहे. तेथील महाराष्ट्रीय नागरिकांनी स्थापन केलेला ग्रुप यासाठी त्यांना मदत करीत आहे.
विक्रमवीर विष्णू मनोहर
2022 च्या गणेशोत्सवात विष्णू मनोहर यांनी नागपुरातच 2500 किलो सातळलेल्या डाळीचा प्रसाद केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे वितरण केले होते. जागतिक खाद्यान्नदिनी विष्णू मनोहर यांनी 2 हजार किलोंचा कुरकुरीत महाचिवडा तयार केला होता. हा त्यांचा 14 वा विश्वविक्रम होता. 5 फूट लांब आणि 5 फूट रुंद असा “सर्वात लांब पराठा’ तयार करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.
3 तासांत 7000 किलोंची महामिसळ तयार करण्याचा विश्वविक्रमही मनोहर यांच्या नावावर आहे. मनोहर यांनी 20 डिसेंबर 2018 रोजी भारतात 3200 किलो वांग्याचे भरीत (बैंगण भरता/वांगी) तयार करून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यांनी 3000 किलो खिचडी तयार करीत नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यानंतर 5000 किलो खिचडी शिजवून त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्षात मनोहर यांनी नाशिकसह 12 शहरांत 4 हजार किलो भगर करून नवा विक्रम केला होता.