मुंबई : पाशवी बहुमताच्या बळावर विधान परिषदेचे कामकाज चालू देणार नसल्याची भूमिका विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी विधानसभेचे कामकाज स्थगित झाल्यानंतर राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी या संदर्भात सकारात्मक चर्चा केली असून आम्ही त्यांच्या निर्णयाची पतिक्षा करत असल्याचे दानवे यांनी सांगितले.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांना तत्काळ दूर करण्याची मागणी आम्ही राज्यपालांकडे केली असल्याचे अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या आधी देखील गोऱ्हे यांच्यावर भाजपने अविश्वास प्रस्ताव दिलेला आहे. आता आम्हीही तसा प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे त्यांना या पदावर काम करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे अंबादास दानवे म्हणाले.
नीलम गोऱ्हेंविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने अपात्रतेची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे त्या सभागृहाचे कामकाज करू शकत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आमच्या नीलम गोऱ्हेंवर विश्वास नाही, त्यांना नैतिक दृष्ट्या पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. त्यामुळे विरोधकांनी विधान परषदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. ठाकरे गटाने विधीमंडळ सचिवांना पत्र पाठवून तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि आमदार विप्लव बजोरिया यांना अपात्र करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.