प्रफुल्ल पटेल यांनी मलाही मंत्रिपदाची ऑफर दिली होती

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट

51
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते प्रफुल्ल पटेल (prafull patel) यांनी मलाही मंत्रिपदाची ऑफर दिली होती. तसेच तत्काळ मुंबई गाठण्याची सूचनाही केली होती, असा दावा राज्याचे माजी गृहमंत्री (Home Minister) तथा राष्ट्रवादीचे (ncp) बडे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीमुळे अवघ्या राज्यात खळबळ माजली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील आदी अनेक मोठ्या नेत्यांनी बंडखोरी केली आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी आपल्यालाही प्रफुल्ल पटेल यांनी मंत्रिपदाची ऑफर दिली होती, असा दावा केला आहे.

2 जुलै दिवशी शपथविधी झाला. त्या दिवशी प्रफुल्ल पटेल यांनी मला दोनवेळा फोन केला. त्यात त्यांनी मला मंत्रिपदाची ऑफर दिली. त्यांनी माझ्यासह अनेक आमदारांशीही संपर्क साधला. यातील काही आमदार बंडखोरीला तयार झाले, तर काहींनी स्पष्ट नकार दिला. आम्ही शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा ठाम निर्धार केला होता, असे अनिल देशमुख म्हणाले.

अधिकाधिक आमदारांची मने आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी अनेकांना सोबत येण्याची ऑफर दिली. पण आम्ही साहेबांसोबत राहिलो आहे. तर काहीजण मंत्रिपदासाठी गेले, असेही ते यावेळी म्हणाले.

उल्लेखनीय बाब म्हणजे गत 2 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर इतर 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांना अजुनही खाते मिळाले नाही. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या बंडखोरीनंतर राज्यभर दौरे सुरू केलेत. त्यांनी शनिवारी नाशिक येथे छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात सभा घेऊन कार्यकर्त्यांची माफी मागितली.

अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले पडली आहेत. अजित पवार व त्यांच्या समर्थकांचा गट सध्या सत्तेत सहभागी झाला आहे. तर शरद पवारांच्या नेतृत्वातील गटाने त्यांच्याविरोधात रान पेटवले आहे. दोन्ही गट आपणच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा करत आहे. त्यातच आता बारामती लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे आव्हान मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.

बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे 2009 पासून या मतदार संघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. तर उपमुख्यंत्री अजित पवार विधानसभेत या मतदार संघाचे नेतृत्व करतात. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर या मतदार संघातील आगामी लढत लक्षवेधक ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना पवार कुटुंबातूनच आव्हान मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे..‎

Google search engine