जुलैमध्ये राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार

निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

7
नाराजी नाट्य
नाराजी नाट्य

मुंबई : जुलै महिन्यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार. मुख्यमंत्री (Chief Minister)  एकनाथ शिंदे (eknath shinde) याबाबतचा निर्णय घेतील, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी दिली आहे. त्यामुळे अखेर राज्याच्या मंत्रिमंडळ (Cabinet) विस्ताराचा मुहूर्त लवकरच निश्चित होणार असल्याचे दिसत आहे.

देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचे सूत्र ठरल्याची माहिती आहे.

बैठकीबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचे अनेक प्रश्न असतात. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठीच काल दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. याशिवाय आम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील. जुलैमध्ये आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू.

दरम्यान, भाजपश्रेष्ठी शिवसेनेच्या काही मंत्र्यांच्या कारभारावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तार करताना या मंत्र्यांची हकालपट्टी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनीही शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाईल, असा दावा केला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यांना कोणतीही बातमी मिळाली नाही, तेच लोक अशा बातम्या पेरतात. यात कोणतीही विश्वासार्हता नाही.

शिंदे गटाच्या दोन नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही शिवसेनेच्या दोन मंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत, असे वक्तव्य केले. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्राचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, हे आम्हाला माहिती नाही. केंद्राच्या व राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. आम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात जास्त इंटरेस्ट आहे.

Google search engine