चीन : चीन (China) सरकारच्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्रात एक लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका (America) दौऱ्याचा उल्लेख आहे. तसेच या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करून भारताला इशारा देण्यात आला आहे. या वृत्तपत्रात चीनने भारताला (India) अमेरिकेपासून दूर राहण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.
चीनच्या विरोधात भारत अमेरिकेच्या जवळ जात असल्याचा दावाही वृत्तपत्राने केला आहे. या वृत्तपत्रात असेही स्पष्टपणे नमूद केले आहे की, ज्या देशांचा फायदा होईल अशा देशांशी अमेरिका संबंध ठेवते, अन्यथा अमेरिकेला पाठीत खंजीर खुपसण्याची सवय आहे.
गंभीर आरोप
चीन सरकारने या वृत्तपत्रात म्हटले आहे की, अमेरिका इतर देशांच्या सद्भावनेच्या बळावर महासत्ता बनलेली नाही, तर इतर देशांना धमकावून ती इथपर्यंत पोहोचली आहे. अमेरिका चीनला घाबरते, त्यामुळे ते इतर देशांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही लिहिले आहे.
अमेरिका जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाहीचा उल्लेख करून अपप्रचार करत असल्याचा दावाही वृत्तपत्राने केला आहे. वृत्तपत्राने असेही म्हटले आहे की अमेरिका भारतासाठी योग्य नाही कारण भारत अमेरिकेची सर्व उद्दिष्टे पूर्ण करू शकतो आणि त्यामुळेच पंतप्रधान मोदींचे इतक्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.
खरं तर भारत आणि अमेरिका यांच्यात चीनशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. यावेळी दोन्ही देशांनी भारत आणि प्रशांत महासागरात चीनचा वाढता धोका, पाकिस्तानची दहशतवादाबाबतची भूमिका आणि रशिया-युक्रेन युद्ध यावर चर्चा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, ‘जागतिक व्यवस्था ही संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचा आदर करणे, विवादांवर शांततापूर्ण तोडगा काढणे, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करणे यावर आधारित आहे.’
त्यामुळे आता अमेरिका आणि भारत यांच्यातील या संबंधांमुळे चीन चांगलाच नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच भारत-अमेरिकेतील या वाढत्या संबंधांमुळे चीन अडचणीत येणार असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या जागतिक राजकारणाचा नेमका कसा परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.