मुंबई : वेदांता – फॉक्सकॉन (Vedanta – Foxconn) गुजरातला गेल्यामुळे राज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मायक्रॉन सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्प महाराष्ट्रात आणा, अशी आग्रही मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्याकडे केली आहे. त्यांनी यासंबंधी शिंदेंना एक पत्र लिहिले आहे. त्यानुसार हि मागणी आहे.
ते म्हणाले, महाराष्ट्र गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून देशातील आघाडीचे राज्य आहे. परदेशी गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र आजही पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. गतवर्षी काही महत्त्वाचे प्रकल्प राज्याबाहेर गेले. पण आता एक संधी महाराष्ट्रासाठी चालून येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सुमारे 22 हजार कोटी रुपयांच्या मायक्रॉन सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात यासंबंधीच्या करारावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा प्रकल्प महाराष्ट्रातच येईल याची खातरजमा करावी, असे नाना पटोले यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
नाना पटोले पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात येणारा वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर चीप प्रकल्प गुजरातला गेला. या प्रकल्पाच्या माध्यमातून 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. तसेच लाखो तरुणांना रोजगार मिळणार होता. याशिवाय इतर पूरक उद्योगांमतूनही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती अपेक्षित होती. पण हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. हे नुकसान भरून काढण्यासाठी मायक्रॉन प्रकल्पाची गुंतवणुक महाराष्ट्रात व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करायला हवेत.