प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा 2 दिवसांपासून दिल्लीत तळ

राज्य काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता

24
नाना पटोले
नाना पटोले

नवी दिल्ली : आगामी लोकसभा (loksabha) व विधानसभा (vidhansabh) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष अंग झटकून कामाला लागलेत. पण काँग्रेसमध्ये (congres) मात्र अंतर्गत मतभेद अन् खांदेपालटाची मालिका जोरात सुरू झाली आहे. मुंबई काँग्रेसच्या नेतृत्वात बदल केल्यानंतर आता काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष (State President) बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी राज्यातील नेत्यांच्या नव्याने दिल्लीवाऱ्या सुरु झाल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मागील 2 दिवसांपासून या प्रकरणी दिल्लीत तळ ठोकून बसलेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्य काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

नाना पटोले यांनी नुकतेच पक्षात कोणताही विसंवाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण काँग्रेस नेत्यांच्या वाढत्या दिल्ली दौऱ्यांमुळे त्यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी दिल्लीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यानंतर आता स्वतः पटोले गत 2 दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून बसलेत.

काँग्रेसच्या राज्यातील काही नेत्यांनी दिल्लीत जावून पटोलेंविरोधात सूर आळवला होता. त्यानंतर लगेच अशोक चव्हाण दिल्लीला गेले होते. ते तिथे सलग 2 दिवस होते. या मुक्कामात त्यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर नाना पटोले यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नसीम खान यांनी दिल्ली गाठून पटोलेंची बाजू लावून धरली. त्यानंतर आता स्वतः पटोले दिल्ली दरबारी हजर झालेत.

पटोलेंना राज्य काँग्रेसच्या नेत्यांचा विरोध

नाना पटोलेंनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेला काँग्रेसच्या इतर नेत्यांचा विरोध आहे. पण पटोले राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यात लाट असताना त्यांनी थेट मोदींवर टीका करत भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले होते. त्यांच्याकडे महाविकास आघाडीतील एक आक्रमक चेहरा म्हणून पाहिले जाते. पण राज्यातील बहुतांश नेत्यांनी त्यांच्याविरोधात भूमिका घेतल्यामुळे त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर टांगती तलवार असल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेणार ठोस निर्णय

त्यानुसार, सध्या दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या मुद्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. पटोलेंकडून प्रदेशाध्यक्षपदाची खुर्ची काढून घ्यायची की राज्यातील जनतेला आणखी एखादा पर्याय द्यायचा यावर काँग्रेसमध्ये धीरगंभीर चर्चा सुरू आहे. या प्रकरणी काँग्रेस श्रेष्ठी लवकरच एखादा ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Google search engine