रेसलर साक्षी, बजरंग, विनेश नोकरीवर परतले

गृहमंत्री अमित शहांना भेटले होते कुस्तीपटू

53
कुस्तीपटू
कुस्तीपटू

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh)यांच्याविरोधातील निदर्शनांत सहभागी झालेली कुस्तीपटू (wrestler) साक्षी मलिक, बजरंग पूनिया व विनेश फोगाट आपल्या नोकरीवर परतलेत. हे तिघेही रेल्वेत नोकरी करतात. रेल्वेच्या जनसंपर्काचे संचलाक जनरल योगेश बवेजा यांनी याची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, तिघांनीही आज ड्यूटी जॉइन केली आहे.

ब्रिजभूषण सिंहांवर लैंगिक शोषणाचे आरोप करणारी अल्पवयीन महिला कुस्तीपटू आपल्या जबाबापासून मागे हटल्याचे वृत्त माध्यमांत झळकल्यानंतर ही बातमी आली आहे. यासंबंधीच्या दाव्यानुसार, अल्पवयीन महिला पैलवानाने दिल्लीच्या कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात जबाब नोंदवला होता. त्यानंतर तिला पटियाला हाऊस कोर्टात नेण्यात आले. तिथे तिने आपल्या जबाबापासून फारकत घेतली. तत्पूर्वी, कुस्तीपटूंनी आंदोलनातून माघार घेतल्याचे वृत्त आले होते. पण कुस्तीपटू साक्षी मलिकने एका ट्विटद्वारे हे वृत्त फेटाळले. न्याय मिळेपर्यंत आपला संघर्ष सुरूच राहील, असे ती म्हणाली.

रविवारी सायंकाळी साक्षी, बजरंग पूनिया व विनेश फोगाट यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. ही भेट जवळपास 2 तास सुरू होती. अल्पवयीन कुस्तीपटूने बृजभूषण यांच्यावर वाईट हेतूने स्पर्श करणे व टी-शर्ट काढण्यासारखे गंभीर आरोप केले होते. पण दिल्ली पोलिसांनी अद्याप त्याची अधिकृत पुष्टी केली नाही. दरम्यान, अल्पवयीनाच्या वडिलांनी ही बातमी खोटी असल्याचा दावा करत माध्यमांशी संवाद साधण्यास नकार दिला आहे.

अल्पवयीन पैलवानाच्या वयाची चौकशी सुरू

अल्पवयीन पैलवानाच्या वयाचाही वाद आहे. मुलीच्या काकांनी दावा केला की, तिचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांचे एक पथक रोहतकला आले होते. शाळेतील नोंदी तपासण्यात आल्या. अल्पवयीन कुस्तीपटू व तिच्या पालकांनी काही दिवसांपूर्वी साक्षी मलिक, विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांच्यासह हरिद्वारमधील हर की पौंडी येथे मेडल्स विसर्जित करण्यास नकार दिला होता. वडीलही कुणाला भेटण्यास तयार नाहीत. तसेच ते त्यांचे लोकेशनही सांगत नाहीत.

ब्रिजभूषण यांना मिळू शकतो दिलासा

अल्पवयीन कुस्तीपटूने तक्रार मागे घेतल्यास ब्रिजभूषण यांच्याविरोधातील पोक्सो कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द केला जाईल. त्यानंतर केवळ विनयभंगाचे प्रकरण राहील. त्या प्रकरणात त्यांना अटक करण्याची गरज भासणार नाही.

Google search engine