विदर्भात कमी पडल्याची अजित पवारांची खंत

अजित पवारांचं नागपुरात विधान

24
अजित पवार
अजित पवार

नागपूर : नागपुरात ( NAGPUR)  राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) दोन दिवसीय चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त विरोधी पक्षनेते अजित पवार (AJIT PAWAR) नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “तेव्हा विदर्भात आम्ही कमी पडलो, हे निविर्वाद सत्य आहे,” अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली आहे.

कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना “पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आमच्या जागा निवडून येतात. पण, तेवढा प्रतिसाद दुर्दैवाने विदर्भात मिळत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगलं यश मिळालं, तर विदर्भात जास्त जागा मागू शकतो. मात्र, विदर्भात आम्ही कमी पडलो हे निविर्वाद सत्य आहे,” असं अजित पवार म्हणाले.

“१९९९ साली राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून पक्षाच्या नेत्यांकडून विदर्भावर अन्याय केला जातोय, अशा बातम्या पसरवण्याचा प्रयत्न झाला. पण, जयंत पाटील अर्थमंत्री आणि मी जलसंपदा मंत्री असताना विदर्भ आणि मराठवाड्यातील अनुशेष निघावा यासाठी काम केलं. यातून आमच्यावर आरोप झाले, बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. आमच्यावर केसेस झाल्या, चौकशा लागल्या ही वस्तुस्थिती खरी आहे,” असेही अजित पवारांनी सांगितलं.

“विदर्भात दोन दिवसांचं शिबीर घेतलं आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या भागात दौरे वाढवले पाहिजेत. येथे निश्चितपणे प्रयत्न केला, तर जनता पाठिशी उभी राहू शकते,” असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे.

Google search engine