मुंबई – शरद पवारांनी “लोक माझे सांगाती” या पुस्तकाच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशनावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा केली होती. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली जाणवल्या मात्र इतर पक्षाच्या नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया देण्याचे टाळले. पवारांच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या या भूमिकेला कार्यकर्त्यांसह नेतेमंडळीनी तीव्र विरोध केला. पक्षाच्या अध्यक्षपदी शरद पवारांनीच कायमस्वरुपी राहिलं पाहिजे, यावर कार्यकर्ते आणि नेते ठाम आहेत. अशी भूमिका सतत पक्षातील नेते प्रसार माध्यमांसमोर मांडत आले होते. यानंतर आज अध्यक्षपदाच्या निवडीसाठी गठीत केलेल्या समितीची बैठक होती. या बैठकीतही शरद पवारांचा राजीनामा एकमताने फेटाळण्यात आला. प्रफुल्ल पटेल यांनी हा राजीनामा फेटाळण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यावर सदस्यांनी एकमताने प्रस्तावाला मंजूरी दिली. समितीने शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळल्यानंतर, स्वतः शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
निवड समितीने शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळला.
स्वतः शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष.