त्रिपुरा | विधानसभेत अश्लील व्हिडिओ पाहताना पकडला गेला भाजपचा आमदार

20

त्रिपुरा : भाजपचा एक आमदार विधानसभेत अश्लील व्हिडिओ पाहत असल्याची क्लिप व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे.

ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्यात दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाला पहिला धक्का बसला आहे. भाजपचा एक आमदार भर विधानसभेत अश्लील व्हिडिओ पाहत असताना पकडला गेला आहे. या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं भाजपची कोंडी झाली आहे. त्रिपुरा विधानसभेचं अधिवेशन सध्या सुरू आहे. हे अधिवेशन सुरू असताना सभागृहात खुर्चीवर बसून आमदार जादब लाल नात हे मोबाईलवर पॉर्न पाहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ आजचा (३० मार्च) आहे. अश्लील व्हिडिओ पाहणारे जादब लाल नाथ हे बागबासा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. जादब लाल नाथ आपल्या सीटवर बसून मोबाइलवर व्हिडिओ पाहत असल्याचं व्हायरल व्हिडिओत दिसत आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत त्रिपुरा हे राज्य डाव्या पक्षांचा बालेकिल्ला मानला जात असे. अनेक वर्षे तिथं डाव्यांची सत्ता होती. देशातील मोदी लाटेत २०१८ साली भाजपची सत्ता आली होती. मात्र, डाव्यांचा गड असलेला बागबासा हा मतदारसंघ भाजपला तेव्हा जिंकता आला नव्हता. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जादब लाल नाथ यांनी ही कामगिरी फत्ते केली. २०१८ च्या निवडणुकीत सीपीएमच्या बिजीता नाथ यांनी भाजपच्या प्रदीप कुमार नाथ यांचा २७० मतांनी पराभव केला. यावेळच्या निवडणुकीत भाजपनं जादब लाल नाथ यांच्यावर विश्वास दाखवला होता. तो त्यांनी सार्थ ठरवला. त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बिजीता नाथ यांचा विजयरथ रोखला. त्यांनी बिजीता नाथ यांचा १४०० मतांनी पराभव केला. तृणमूल काँग्रेसचे बिमल नाथ तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते, तर टिपरा मोथाच्या कल्पना सिन्हा चौथ्या स्थानावर राहिल्या. या विजयामुळं पक्षात त्यांचं वजन कमालीचं वाढलं होतं. मात्र, आजच्या घटनेमुळं त्यांच्यासह भाजपचीही कोंडी झाली आहे.

Google search engine