सातारा : पंढरपूरला (Pandharpur) विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या कोरेगाव तालुक्यातील भाविकांच्या बोलेरो (Bolero) गाडीला माण तालुक्यातील लोधवडेजवळ भीषण अपघात झाला आहे. गाडी पलटी होऊन झालेल्या या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी जखमींना गोंदवले येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे.
कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी गावातील 8 भाविक विठुरायाच्या Vithuraya) दर्शनासाठी बोलेरो जीपमधून पंढरपूरकडे निघाले होते. गुरूवारी सकाळी लोधवडे (ता. माण) गावाजवळ भाविकांची बोलेरो जीप (क्र. एम. एच. 11 बी. एच. 0896) पलटी झाली. कल्याण भोसले, अण्णा गाढवे, पप्पू भिसे, दादासो थोरात, सागर भोसले, विजय माने, श्रीमंत पवार आणि रुद्र भोसले, असे आठ जण गाडीतून प्रवास करत होते. या अपघातात गाडीतील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
भाविकांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीतील जखमींना तातडीते गोंदवले ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना 108 रूग्णवाहिकेतून अधिक उपचारासाठी अन्यत्र पाठविण्यात आले. सर्व जखमी हे कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी गावचे रहिवासी आहेत.
हा अपघात हा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या रस्त्यातील उंच-सखलपणामुळे वेगात असणार्या वाहनांवरील चालकाचा ताबा सुटून अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. यापूर्वीदेखील या रस्त्यावर असे अपघात झालेले आहेत. त्यामुळे रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.