वडीलांच्या चौदावीनिमित्त भावंडांनी घातला आदर्श.
चंद्रपूर (Chandrapur) : धार्मिक विधी आणि कर्मकांडाच्या भानगडीत न पडता चंद्रपुरातील भावंडांनी वडीलांच्या चौदाविनिमित्त नवा पायंडा घालत समाजसमोर आदर्श निर्माण केला. ग्रामगीता व्याख्यान, उपस्थितांना ग्रामगीता भेटस्वरूपात देण्यासोबतच 10 गरीब विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे शुल्क भरून वडीलांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली.

घुटकाळा येथील रहिवासी आबाजी पाटील ठाकरे यांचे 29 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दिवंगत आबाजी पाटील ठाकरे हे सेवानिवृत्त शिक्षक होते. आयुष्यभर त्यांनी विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे गिरवले. आपल्या सेवाकाळात अनेक गरीब विद्यार्थ्यांची फी त्यांनी स्वतः भरली. पैश्यामुळे कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, हे मूल्य ते आयुष्यभर जपले. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या घरात आसरा दिला. त्यांना परीक्षेच्या दृष्टीने मोफत शिकवणी दिली. याच विद्यार्थ्यांपैकी आज अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत आहेत. शालेय विद्यार्थ्यांसोबत आबाजी पाटील ठाकरे यांनी आपल्या मुलामुलींनाही संस्कार दिले. पुरोगामी विचारांचा पगडा असलेले आबाजी पाटील ठाकरे निस्सीम गुरुदेव भक्त होते. राष्ट्रसंतांच्या विचारांनी वडिलांसोबत मुलेही प्रेरीत झाली आणि त्या मार्गावर चालायला लागली. मोठा मुलगा दीपक आज अमेरिकेत कार्यरत आहे तर लहान प्रकाश ॲक्सिस बँकेत उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहे. वंदना आणि प्रतिमा या आज आदर्श गृहिणी आहेत

वडीलांच्या निधनानंतर या भावंडांनी रूढी, प्रथा, परंपरा यांना फाटा देत चौदावीनिमित्त प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. इतर नातेवाईकानीही त्यांच्या या विचारांचे कौतुक करत प्रोत्साहन दिले. चौदावीनिमित्त जगन्नाथ बाबा मठ येथे बंडोपंत बोढेकर यांच्या ग्रामगीतेवरील प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. याच वेळी उपस्थितांना ग्रामगीता भेट म्हणून देण्यात आली. विशेष म्हणजे वडीलांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा सन्मान करीत 10 गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या चालू शैक्षणिक वर्षाचा शिक्षण शुल्काचा खर्च उचलला. विशेष म्हणजे ठाकरे भावंडं दरवर्षी वेगवेगळ्या 10 गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षण शुल्काचा खर्च उचलणार असल्याचे भावंडांनी सांगितले.
चौदावी निमित्त आयोजित या प्रबोधन कार्यक्रमाला श्रीमती छबुताई ठाकरे, दीपक ठाकरे, मेघा ठाकरे, प्रकाश ठाकरे, विशाखा ठाकरे, वंदना सोमेश्वर बलकी, प्रतिमा किशोर पिदुरकर यांच्यासह श्याम झाडे (ब्रह्मपुरी) यांच्यासह गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.