शहरातील मध्यवस्तीत बचाव कार्यासाठी लागली बोट.
नागपूर (Nagpur) : नागपुरात ढगफुटीसदृष्य झालेल्या पावसाने प्रशासनाच्या दाव्यांचे पितळ उघडे पडले. झोपडपट्ट्यासह शहरातील खोलगट भागात कंबरभर पाणी साचले. पण, सीता बर्डी(Sita Buildi), रामदासपेठ(Ramdaspeth), धरमपेठ(Dharampeth), पंचशील चौक(Panchasheel Square) आदी श्रीमंतांच्या चकाचक भागातही बाजारपेठांमध्ये(Bazarpeth) गुडघाभर पाणी साचले होते. या भागात बचाव कार्यासाठी बोटींचा वापर करावा लागला.
मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) हे सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात हाेते. बचाव कार्यासाठी एसडीआरएफच्या 2 तुकड्या 7 गटात विभागण्यात आल्या. सखल भागातील नागरिकांना बाहेर काढण्यात आले. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमूंनी आतापर्यंत 400 हून अधिक नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. मूक-बधीर विद्यालयातील 70 विद्यार्थी, एलएडी कॉलेजमधील 50 विद्यार्थिनींनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले.
मोरभवन बसस्थानकात फसलेल्या 14 प्रवाशांसह शहराच्या विविध भागात फसलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
शुक्रवारी मध्यरात्री 2 ते पहाटे 5 पर्यंत मुसळधार पाऊस झाला. एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या प्रत्येकी 2 तर लष्कराच्या दोन चमू तातडीने तैनात करण्यात आल्या. लष्कराची एक चमू वापरण्यात आली. दुपारनंतर पूर पूर्णपणे ओसरल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. या पावसाने अंबाझरी(Ambazari), शंकरनगर(Shankar Nagar), हजारीपहाड(Hazaripahad), नंदनवन(Nandanvan), नागनदीला(Naagnadi) लागून असलेला परिसर प्रभावित झाला.
सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलेल्यांसाठी तात्पुरते निवारे, जेवण इत्यादींची व्यवस्था करण्यात आली. या पावसात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. तर हजारी पहाड भागातील एकूण १४ जनावरे सुद्धा मृत्यूमुखी पडली. झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणाचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. आता परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन पूर्णत: सज्ज आहे.
अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो
अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला. पाण्याच्या फोर्समुळे त्या परिसरातील भिंत पडली आणि पुलाचा कठडा पडला आहे. या पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे अंबाझरीकडून धरमपेठ महाविद्यालयाकडे जाणाऱ्या सिमेंट रोडच्या एका बाजूचे गट्टु पूर्णपणे उखडल्याने परिसरातून चार वाजल्यापासून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. परिसरात वाहतूकीचा खोळंबा झालेला आहे. अंबाझरीसह अनेक भागातील दुचाकी पूर्णपणे पाण्याखाली बुडल्याने लोकांनी त्या उलट्या करून ठेवलेल्या होत्या.
या नैसर्गिक आपत्तीमुळे घरात पुराचे पाणी शिरल्याने लोकांच्या घरचे सोफे, टी.व्ही, फ्रीज, किचनमधील साहित्य, अन्नधान्य सुध्दा पाण्यात बुडाले. मध्यमवर्गीय कटुंबातील लोकांचे नुकसान झाले आहे. तसेच झोपडपट्टीतील रहिवाशांचे संसार उघड्यावर पडले आहे.