काँग्रेसचा ओबीसींमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न: बावनकुळे यांचा आरोप.

11
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule

‘ते दोन समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम करतात’.

नागपूर (Nagpur) : मराठा समाजाला आरक्षण देताना ते वेगळ्या प्रवर्गातून देण्याची सरकारची भूमिका असल्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. राज्य सरकारच्यावतीने देखील हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतर काँग्रेसचे नेते जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यामुळे मराठा व ओबीसी समाजाचा काँग्रेसवर विश्वास राहिलेला नसल्याची टीकादेखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

ओबीसी महासंघाने आंदोलन आणि मोर्चा काढला. या मोर्चात भाजपचेच नाही तर सर्वच पक्षाचे नेते होते. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे सर्वपक्षीय बैठकीमध्येच ठरले आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनेदेखील त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ओबीसी आंदोलनाला सर्व पक्षाच्या नेत्यांनी समर्थन केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, मात्र त्यात ओबीसीचे आरक्षण कमी होणार नसल्याचा दावादेखील चंद्रशेखर  बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) नेहमीच जनतेची दीशाभूल करत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. वास्तविक काँग्रेस विकासाच्या कामावर चर्चा करण्यापेक्षा दोन समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम करत असल्याची टीकादेखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) इतिहास घडवला

महिलांच्या संदर्भात संसदेत सादर करण्यात आलेल्या आरक्षण विधेयकाबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक केले. महिला आरक्षणासाठी काँग्रेसने कधीच प्रयत्न केला नसल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. आता महिला आरक्षणाबाबत विधेयक मांडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवा इतिहास घडविला असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. देशातील निम्म्या संख्येत असलेल्या महिलांना 33 टक्के आरक्षण मिळेल व त्या देखील देशाच्या जडण-घडणीत हातभार लावतील, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

Google search engine