वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली.

16
वैनगंगा नदी
वैनगंगा नदी

भंडाऱ्यातील अनेक कुटुंब सुरक्षित स्थळी हलवली.

नागपूर/भंडारा (Nagpur/Bhandara) : गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील 48 तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदी (Vainganga River) धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागली आहे. त्यामुळं भंडारा शहरातील अनेक सखल भागात पुराचे पाणी शिरायला सुरूवात झाली असून अनेक कुटुंब सुरक्षित स्थळी हलवण्यात आली आहे. तर, भंडारा शहराला पुराचा फटका बसू नये यासाठी गोसीखुर्द धरणाच्या 33 गेट मधून 5 लाख 97 हजार 775 क्युसेस प्रती सेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग वाढविला आहे.

गोंदिया, मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात झालेल्या जोरदार पावसामुळे भंडारा येथे वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहराजवळील कारधा नदीवरून तीन मीटरवरुन नदीचे पाणी वाहत आहे. त्यामुळं भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान गोसेखुर्द धरणाचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सकाळी 8 वाजता वैनगंगा नदीची कारधा पाणी पातळी 246. 30 एवढी नोंद करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील संजय सरोवर, धापेवाडा धरणांतून सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील जीवनदायीनी मानल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीने रात्री 11१.45 वाजता धोक्याची पातळी ओलांडली.

Vainganga River
वैनगंगा नदी.

2020-21 मध्ये आलेल्या महापुराची स्थिती पुन्हा येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तथापि भंडाऱ्याला जोडणारा ब्रिटिश कालीन पूल वैनगंगा नदीच्या पाण्याखाली गेला आहे. पुलावरुन तीन फुटावरून पाणी वाहत आहे. भंडारा शहरातील ग्रामसेवक कॉलनी, भोजपुर, मेंढा, टाकळी, टप्पा मोहल्ला या सखल भागातील वसाहतीत पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. तसेच नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आंतरराज्य मार्ग बंद

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या बपेरा येथील नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने हा आंतरराज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेला आहे. यासह जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले असल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. पावसाने उसंत घेतली असली तरी मध्यप्रदेश आणि गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. त्यामुळे दुपारनंतर आणखी गंभीर परिस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Google search engine