खासगी बसेसच्या नियमित तपासणी कार्यवाहीचा तपशील द्या !

उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी यांचे वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्र

12

नागपूर. नागपूर शहरातील खासगी बसेसच्या नियमित तपासणी संदर्भात करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा तपशील सादर करण्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांचे मानद सचिव संदीप जोशी (Sandeep Joshi) यांनी वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाला(Regional Transport Department) केली आहे. समृद्धी महामार्गावरील भीषण अपघाताच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार संदीप जोशी यांनी वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त, पोलीस उपायुक्त झोन 3 आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना पत्र पाठवून पुढील 10 दिवसांत कार्यवाहीचा तपशील मागितला आहे.

समृद्धी महामार्गावर घडलेल्या दुर्दैवी भीषण अपघातानंतर खासगी बसेसच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या जीवावर बेतणारा आणखी कुठलाही प्रवास घडू नये या दृष्टीने खासगी बसेसच्या सुरक्षा मानकांविषयी खबरदारी घेण्याची गरज आहे. अशा बसेसच्या सुरक्षा मानकांसंदर्भात श्री. संदीप जोशी यांनी उपरोक्त तीनही विभागांना पत्राद्वारे विचारणा देखील केली आहे.

सर्वच खासगी बसेस मधून प्रवासी वाहतुकीसोबतच माल वाहतूक देखील केली जाते. बसच्या टपावर आणि मागील बाजूस डिक्कीमध्ये देखील सुमारे 4 ते 5 टन माल वाहतूक नेहमीच असते. यासंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र त्याचेही उल्लंघन केले जाते. यासंदर्भात विभागाकडून नियमित तपासणी केली जाते का? तसेच अनेक खासगी बसेसचे मालवाहतुकीसाठी गोदामे असून अशी गोदामे ठेवता येतात का, असा सवाल श्री. जोशी यांनी पत्राद्वारे केला आहे.

प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व खासगी बसेसचे फिटनेस सेफ्टी सर्टिफिकेट्स सोबतच पीयूसी तपासण्याची गरज आहे. या तपासणी विषयी मागील वर्षभरात करण्यात आलेल्या कार्यवाहीची देखील माहिती.जोशी यांनी मागितली आहे. याशिवाय गाडीत अग्निशमन यंत्र आणि काच फोडण्यासाठी हाथोडा (हॅमर) असणे आवश्यक आहे. प्रवासी सीट वाढविण्याच्या हव्यासापोटी बसमध्ये फेरबदल करून सीट वाढवले जातात. सर्व सुरक्षा मानक, आपात्कालीन दरवाज्यांची संख्या आदी देखील तपासणी गरजेची असून या सर्व बाबींची तपासणी देखील नियमित केली जाते का, अशीही विचारणा त्यांनी केली आहे.

समृद्धी सारख्या महामार्गावर 120ची वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र आपल्याकडील खासगी बसेस त्या वेगाने सतत प्रवास करण्याच्या क्षमतेच्या आहेत काय, चालक योग्य प्रशिक्षित आहेत काय, यावर नियमावली गरजेची आहे. 120 च्या गतीने सतत वाहन चालविताना टायर मधील हवा एक्सपांड होऊन तयार फुटण्याच्या घटना अपघाताला कारणीभूत ठरतात. यावर तज्ञांनी मांडलेल्या मतानुसार नायट्रोजन हवा गरम होत नसल्याने लांबच्या प्रवासी वाहनांसाठी उपयुक्त आहे, या देखील बाबींची तपासणी नियमित होते का, अशीही विचारणा संदीप जोशी यांनी पत्राद्वारे केली आहे.
या सर्व विषयांबाबत वाहतूक पोलीस, पोलीस आणि प्रादेशिक परिवहन या तीनही विभागांपैकी संबंधित विभागाद्वारे होत असलेल्या कार्यवाहीचा तपशील उपमुख्यमंत्री कार्यालयात 10 दिवसाच्या आत सादर करण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी यांनी केली आहे.

Google search engine