सफाई कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी कुलगुरूंच्या कक्षात ठिय्या आंदोलन

३५ कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या अमानवी निर्णयाचा नोंदविला निषेध

31
संदीप जोशी
संदीप जोशी

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील (Rashtrasant Tukdoji Maharaj of Nagpur University) (RTMNU) सफाई कर्मचाऱ्यांना (Cleaning staff) कुठल्याही पूर्वसूचनेविना कामावरून काढून टाकल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता.२६) मा. कुलगुरू सुभाष चौधरी यांच्या कक्षात पीडित सर्व सफाई कर्मचाऱ्यांसह माजी महापौर संदीप जोशी व भाजपा शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांच्या समवेत कल्पना पांडे, सिनेट सदस्य विष्णू चांगदे, शिवानी दाणी यांची उपस्थिती होती.

विद्यापीठाद्वारे नियुक्त एजन्सींद्वारे गरीब आणि गरजू सफाई कर्मचाऱ्यांची आधीच आर्थिकदृष्ट्या पिळवणूक करण्यात येत होती. आता त्यात थेट त्यांना कामावरून काढण्याचा निर्णय हा अमानवी असल्याचे सांगत या निर्णयाचा तीव्र शब्दांत आमदार प्रवीण दटके आणि माजी महापौर संदीप जोशी यांनी निषेध नोंदविला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे स्वच्छतेसाठी तीन एजन्सी नियुक्त करण्यात आलेल्या होत्या. विद्यापीठ, कॅम्पसमधील विभाग, वसतीगृह आणि इतर कार्यालयांची स्वच्छता उत्तम व्हावी यासाठी खासगी एजन्सीला काम देण्यात आले आहे. मात्र यापैकी एका एजन्सीच्या कागदपत्रांमध्ये घोळ असल्याने ती एजन्सी बरखास्त करण्याचा निर्णय विद्यापीठाद्वारे घेण्यात आला. परंतू या एजन्सीमध्ये कार्यरत ३५ सफाई कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कुठलाही निर्णय विद्यापीठ प्रशासनाद्वारे घेण्यात आला नाही. त्यामुळे या सफाई कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावून उपासमारीची वेळ ओढावली आहे.

विद्यापीठाद्वारे एजन्सीला प्रति स्वच्छता कर्मचारी २०८८६ रुपये मासिक वेतन या दराने देयक दिले जाते. मात्र एजन्सी सफाई कर्मचाऱ्यांना केवळ ७५०० रुपये देत असल्याचा प्रकार पुढे आणून मागील वेळी संदीप जोशी यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढविण्याची मागणी केली होती. यानंतर ७५०० वरून १२००० रुपये प्रति कर्मचारी वेतन एजन्सीद्वारे देण्यात येत होते. मात्र अशात एका एजन्सीला बरखास्त केल्यानंतर नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात विद्यापीठाकडून कुठलीच संवेदनशीलता दाखविली जात नाही आहे. हा अत्यंत अमानवीय निर्णय असून सर्व ३५ कर्मचाऱ्यांना नोकरीवर घेण्याची मागणी यावेळी माजी महापौर संदीप जोशी यांनी कुलगुरू सुभाष चौधरी यांच्याकडे केली.

तीन एजन्सीपैकी एक एजन्सी बरखास्त झाल्याने या एजन्सीतील ३५ सफाई कर्मचाऱ्यांना इतर दोन एजन्सीमध्ये समायोजित करण्यात येईल तसेच या कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात येईल, असे आश्वासन यावेळी कुलगुरूंमार्फत देण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांच्या न्यायाच्या दृष्टीने १ जुलै २०२३ पर्यंत सर्व कर्मचाऱ्यांकरिता दोन्ही आश्वासनांची पूर्ती केली जाणे आवश्यक आहे. मात्र यानंतरही या कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास उग्र स्वरूपातील आंदोलन केले जाईल व याची सर्वस्वी जबाबदारी कुलगुरूंची असेल, असा इशारा देखील यावेळी माजी महापौर संदीप जोशी व आमदार प्रवीण दटके यांनी दिला.

Google search engine