महसूल विभागात संपूर्ण ई-ऑफिस प्रणाली सुरु

वर्धा जिल्हा ई-ऑफिस करणारा राज्यात पहिला

25
संपूर्ण ई-ऑफिस प्रणाली सुरु
संपूर्ण ई-ऑफिस प्रणाली सुरु

नागपूर : एकात्मिक प्रकल्प व्यवस्थापनांतर्गत विभागीय (Departmental under Integrated Project Management) आयुक्त कार्यालयातील दैनंदिन प्रशासकीय कामे ‘महा-ई ऑफिस’ प्रणालीच्या वापरामुळे सुलभ व गतिमान झाली आहेत. या प्रणाली अंतर्गत आतापर्यंत ६०० पेक्षा अधिक प्रकरणांवर निर्णय घेण्यात आले. ही प्रणाली संपूर्ण विभागात प्रभाविपणे राबविण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी (Vijayalakshmi Bidari) यांनी दिली.

ई-ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी राज्यात प्राधान्याने नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात करण्यात येत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयापासून ई-ऑफिस प्रणालीचा गतवर्षीच्या स्वातंत्र्य दिनापासून सुरुवात झाली आहे. शासकीय कामात संगणकाचा अधिकाधिक वापर करुन कामकाज गतिमान व्हावे, कामकाजात सुसूत्रता यावी, दस्ताऐवज सुरक्षित राहावे तसेच माहिती जलद गतीने प्राप्त होऊन निर्णय प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी ई-ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी परिणामकारकपणे करण्यात आली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हास्तरीय महसूल व इतर विभागांकडून ई-ऑफिस प्रणालीव्दारे फाईलचा प्रवास सुरु झाला. यामध्ये १ हजार ९११ फाईल्सची नोंद झाली आहे. आयुक्त कार्यालयातील महसूल, पुरवठा, नियोजन, रोजगार हमी योजना, पुनर्वसन, नगरपालिका प्रशासन, आस्थापना शाखा, विकास शाखा आदी विभागांकडून ई-ऑफिस प्रणाली राबविण्यास सुरुवात झाली आहे.

जिल्हा स्तरावर ‘ई-ऑफिस’ ची अंमलबजावणी

वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालय तसेच तहसिल कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणालीचा वापर सुरु झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यत ५४ हजार १७० फाईल्स या प्रणालीव्दारे हाताळण्यात आल्या असून ४२ हजार १७६ डाक व टपाल प्रकरणांचा यामध्ये समावेश आहे. महसूल विभागात संपूर्ण ई-ऑफिस प्रणाली सुरु करणारा वर्धा जिल्हा राज्यात पहिला ठरला आहे अशी माहिती, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.

भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्मिक प्रकल्प व्यवस्थापन कक्षांतर्गत ई-ऑफिस प्रणालीचा वापर सुरु झाला असून तालुका स्तरावरही या प्रणालीचा वापर करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासाठी सर्व विभागांमध्ये नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. जिल्ह्यात यावर्षी ८ मार्चपासून ई-ऑफिस प्रणालीला सुरुवात झाली असल्याची माहिती, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली. ई-ऑफिस प्रणालींतर्गत विभागातील नागपूर जिल्ह्यात ६३२, गोंदिया जिल्ह्यात ६०, गडिचिरोली ४६, भंडारा ८७ तर चंद्रपूर जिल्ह्यात २४२ फाईल्सचा निपटारा करण्यात आला आहे.

Google search engine