रुग्णालयात आलेला कैदी पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पसार

छत्रपती संभाजीनगर येथील घटनेने खळबळ

32
kaidi
kaidi

छत्रपती संभाजीनगर : खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला एक आरोपी पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पसार झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात घडली. भर दिवसा हा प्रकार घडल्यामुळे रुग्णालय परिसरात एकच खळबळ माजली होती.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, लखन प्रल्हाद मिसाळ असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर जालन्यातील सदर बाजार पोलिस ठाण्यात भादवि कलम 307 व आर्म अॅक्ट अंतर्गत 6 महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. सध्या तो न्यायालयीन कोठडीत होता. जालना पोलिसांचे 3 कर्मचारी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात घेऊन आले होते. पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याची एमआरआय चाचणी होणार होती. पण रुग्णालय परिसरात तो पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पसार झाला. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी एकच धावपळ उडाली.

पोलिसांच्या तावडीतून गुन्हेगार पळाल्याची बाब ऐकून घटनास्थळी एकच गर्दी झाली. यामुळे पोलिसांचेही धाबे दणाणले होते. पण वेळीच घाटी रुग्णालयात तैनात खासगी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. यासाठी पोलिसांना रुग्णालयाजवळील खोल नाल्यात उतरावे लागले.

पोलिसांनी नाल्यात उतरून पकडले

पोलिसांच्या हाताला हिसका दिल्यानंतर आरोपीने रुग्णालयाशेजारील नाल्याच्या दिशेने धाव घेतली. तो थेट नाल्यात उतरला. त्याच्या मागे पोलिसांनाही नाल्यात उतरावे लागले. त्यांनी गणवेशासह नाल्यात उतरून त्याला ताब्यात घेतले.

Google search engine