नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांचा भर कोर्टातच राजीनामा

14

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी न्यायालयातच राजीनामा दिला आहे. न्यायालयातच राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे रोहित देवच्या निवृत्तीला एक वर्ष बाकी होते. त्याआधी त्यांनी न्यायालयात राजीनामा जाहीर केला. त्यांची घोषणा ऐकून उपस्थित वकील आणि न्यायालयातील कर्मचारीही अवाक झाले. त्यानंतर देव यांच्या राजीनाम्याचीच चर्चा न्यायालय परिसरात सुरू होती. या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला.

सर्वांकडे दिलगिरी

यावेळी त्यांनी सर्वांची माफीही मागितली. मी उपस्थितांची माफी मागतो. माझ्या वागण्याने कोणाचे मन दुखावले असेल तर मी माफी मागतो. मी आज माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. सेवेतून मुक्त होत असल्याचे रोहित देव यांनी राजीनामा देताना सांगितले. तसेच वकिलांना कठोर परिश्रम घेण्याचा सल्ला देताना काही प्रसंगी तुमच्याशी कठोर वागल्याबद्दल मी माफी मागतो, असेही ते म्हणाले. माझ्या आत्मसन्मानाच्या विरोधात मी काम करू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले.

सर्वांना आश्चर्य

न्यायामूर्ती रोहित देव यांनी नक्षलवाद्यांशी संबंध असलेले प्रा. जीएन साईबाबा यांना निर्दोष मुक्त केलं होतं. त्यांच्या या निर्णयानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाचा निर्णय फिरवून साईबाबा यांना दोषी ठरवलं होतं. देव यांच्या राजीनाम्या मागे हेही एक कनेक्शन असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, देव किंवा इतर कुणीही त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण सांगितलेलं नाही. विशेष म्हणजे देव यांच्या निवृत्तीला एक वर्ष बाकी असताना त्यांनी असा तडकाफडकी निर्णय कसा घेतला? याचचं आश्चर्य सर्वांना वाटत आहे.

Google search engine