पंतप्रधान मोदींनी सांगितला ‘तो’ किस्सा

8

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत आणि टिळक स्मारक समितीचे डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर आणि सरदार वल्लभभाई पटेल या महापुरुषांबद्दल सांगितले. इतिहासातील अनेक घटनांचाही त्यांनी उल्लेख केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, लोकमान्य टिळक हे संपूर्ण देशासाठी आदर्श आहेत. महाराष्ट्रातील जनतेचे त्यांच्यावर विशेष प्रेम आहे. महाराष्ट्रातील लोकांप्रमाणेच गुजरातमधील जनतेचेही लोकमान्य टिळकांशी विशेष नाते आहे. स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळकांना दीड महिना अहमदाबादच्या साबरमती तुरुंगात कैद करण्यात आले होते. ते 1916 मध्ये अहमदाबादलाही आले होते. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतही लोकमान्य टिळकांच्या स्वागतासाठी 40 हजारांहून अधिक लोक जमले होते हे ऐकून तुम्हाला आनंद होईल. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेलही उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, त्यावेळी लोकमान्य टिळकांच्या अहमदाबादमधील भाषणाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर वेगळी छाप सोडली होती. काही वर्षांनी जेव्हा सरदार पटेल अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला. पटेल यांनी अहमदाबादमध्ये टिळकांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला. सरदारांनी त्यासाठी अहमदाबादमधील व्हिक्टोरिया गार्डनची निवड केली. इंग्रजांसाठी हे उद्यान अतिशय खास होते. कारण, ब्रिटिशांनी 1897 मध्ये राणी व्हिक्टोरियाच्या डायमंड ज्युबिली साजरी करण्यासाठी अहमदाबादमध्ये हे उद्यान बांधले होते. सरदार पटेल यांनी ब्रिटीश राणीच्या नावाने बांधलेल्या उद्यानात देशाच्या महान क्रांतिकारकाचा म्हणजेच टिळकांचा इंग्रजांच्या छातीवर पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी व्हिक्टोरिया गार्डनमध्ये लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण सरदार तर सरदार होते. ते म्हणाले, मी राजीनामा देऊन माझं पद सोडेन, पण पुतळा तिथेच बसवला जाईल. त्यानंतर 1929 मध्ये महात्मा गांधींच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. अहमदाबादमध्ये असताना मी अनेकदा तिथे गेलो आहे. अनेकदा त्या मूर्तीचे दर्शन घेतले असल्याचे त्यांनी त्यांनी सांगितले.

 

Google search engine