सुनील शेट्टीच्या बुद्धीची कीव येते; स्वाभिमानीचा निशाणा

32

मुंबई : टोमॅटो दराच्या (Tomato Price) मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अभिनेता सुनिल शेट्टीवर (Sunil Shetty) जोरदार टीका केली आहे. अभिनेता सुनील शेट्टींना भाव परवडत नसेल तर टोमॅटो खावू नये. उगाच कांगावा करण्याची गरज नाही, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी सुनिल शेट्टीवर टीका केली आहे. टोमॅटो खाल्ले नाहीतर सुनील शेट्टी मरणार नाही असेही तुपकर म्हणाले.

सुनिल शेट्टी काय म्हणाला ?

सुपरस्टार असलो म्हणून काय झालं, आम्हीही महागाईला सामोरे जात असतो. मी या दिवसात टोमॅटो खाणे कमी केले असल्याचे वक्तव्य सुनिल शेट्टीने केले होते. त्याच्या या वक्तव्यावर विविध स्तरातून टीका होत आहे. शेतकरी संघटना देखील आक्रमक झाली आहे. सध्या टोमॅटोचे दर वाढले आहेत, याचा परिणाम आमच्या स्वयंपाकघरावर झाला आहे. मी या दिवसात टोमॅटो खाणे बंद केल्याचं सुनिल शेट्टीनी म्हटलं होतं. त्यावर जोरदार टीका होतेय.

रविकांत तुपकर काय म्हणाले?

टोमॅटोचे भाव वाढले म्हणून इंटरनॅशनल विषय करणाऱ्या अभिनेता सुनील शेट्टींना भाव परवडत नसेल तर टोमॅटो खावू नये. उगाच कांगावा करण्याची गरज नाही. तुमच्या मालकीच्या हॉटेलमधील जेवणही अनेकांना परवडत नाही, मग आम्ही काही म्हणतो का? सुनील शेट्टीच्या बुद्धीची कीव येते, अशा शब्दात रविकांत तुपकर यांनी टीका केली आहे.

खोतांचा सुनिल शेट्टीवर टीका

टोमॅटो महाग झाल्यामुळे सुनिल शेट्टीनं केलेल्या वक्तव्यावर रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी जहरी टीका केली आहे. टोमॅटोचे भाव वाढल्याने शेतकऱ्याला फायदा होतो तर चुकीचं काय? असा प्रश्न सदाभाऊंनी विचारला आहे. दोन पैसे शेतकऱ्याला मिळाले तर सुनील शेट्टीच्या पोटात दुखतं का? असा खोचक सवालही सदाभाऊंनी केला आहे. सुनील शेट्टीला सदाभाऊ खोत यांनी जागतिक भिकाऱ्याचीही उपमा दिली. सुनील शेट्टी बाजारू कलावंत असल्याचंही सदाभाऊ खोत म्हणाले.

केंद्र सरकारचा हस्तक्षेप

सध्या बाजारात टोमॅटोचे दर वाढल्यामुळं ग्राहकांना मदत करण्यासाठी आणि त्यांना स्वस्तात टोमॅटो उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारनं हस्तक्षेप केला आहे. केंद्र सरकार महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून कांद्याची खरेदी करणार आहे. दोन ते तीन महिन्यापूर्वी विपरीत परिस्थिती शेतकऱ्यांवर आली होती.

Google search engine