अजित पवारांनी पहिल्यांदाच केलं शरद पवारांच्या वयावर भाष्य; म्हणाले…

14

मुंबई : राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी केल्यानंतर अजित पवार यांच्या गटाचा मेळावा मुंबईत (Mumbai) सुरू आहे. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या भाषणात थेट शरद पवारांवरच (Sharad Pawar) जोरदार निशाणा साधला आहे. ‘आपले वरिष्ठ नेते चव्हाण साहेबांच्या समाधीला गेले. माझ्याकडूनही घोडचूक झाली होती. मी सुद्धा तिथे बसलो होतो. आता वय जास्त झालं, 82 – 83 झालं, आता तुम्ही थांबणार आहात की नाही, तुम्ही आशीर्वाद द्या ना. तुम्ही शतायुषी व्हावं’, असं म्हणत अजित पवार यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वयावर भाष्य केलं आहे.

नंतरच्या काळात आता नवी पिढी पुढे येते आहे. तुम्ही आशीर्वाद द्या ना.. चुकलं तर सांगा की अजित तुझं हे चुकलं. चूक मान्य करुन दुरुस्त करुन पुढे जाऊ. पण हे कुणासाठी चाललं आहे? आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? मित्रांनो आज आपले वरिष्ठ नेते यशवंत राव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेले होते. यशवंतराव हे आपलं दैवतच आहेत. माझ्याकडूनही चूक झाली होती तेव्हा मी एक दिवस आत्मक्लेश केला होता. मला माझंच वागणं मनाला लागलं होतं. आता जर वय जास्त झालं ८२ झालं, ८३ झालं तर तुम्ही कधी थांबणार आहात का? वयाच्या बाबतीत तर आम्हाला वाटतं की तुम्ही शतायुषी व्हावं.

मला हे सांगण्यात आलं की मी राजीनामा देतो, संस्था बघतो. त्यानंतर एक कमिटी करतो, त्या कमिटीत तुम्ही सगळे प्रमुख बसा. ते बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा सांगितलं त्यालाही आम्ही तयार झालो. त्यानंतर दोन दिवसांत काय घडलं कुणास ठाऊक? त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? मला महाराष्ट्राने सांगावं की आमच्यात धमक आहे की नाही? जे प्रमुख नेते म्हणून पाहिले जातात त्यात माझं नाव शेवटी का होईना येतं ना? मग मला का आशीर्वाद का दिला जात नाही. शेतकरीही ६० वर्षांचा झाला की २५ वर्षांच्या मुलाला सांगितलं जातं आता शेती तू बघायची आणि आम्ही तुला सल्ला देऊ. मी सुप्रियालाही बोललो, ते हट्टी आहेत. असला कसला हट्ट आहे’ असा सवालही अजितदादांनी केला.

आज राष्ट्रवादीवर ही वेळ का आली?

आज राष्ट्रवादीवर आणि आपल्यावर ही वेळ का आली? मी देखील साहेबांच्याच छत्रछायेखाली तयार झालो आहे. १९७८ ला आपल्या वरिष्ठ नेत्यांनी वसंतदादा पाटील यांचं सरकार स्थापन करून पुलोदचं सरकार आणलं. त्यावेळी शरद पवार हे ३८ वर्षांचे होते. तेव्हापासून साहेबांचं राजकारण महाराष्ट्र बघत होते. पुलोदच्या सरकारमध्ये जनसंघही होता, जो आत्ताचा भाजपा आहे.

देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख झाली पाहिजे. हे माझं स्वप्न आहे. २००४ ला आपले ७१ आमदार आले आणि काँग्रेसचे ६९ आमदार आले. त्यावेळी मला पक्षात फार महत्त्वाचं स्थान नव्हतं. त्यावेळी सोनिया गांधी यांनी विलासरावांना हे सांगितलं होतं की राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल. आम्हाला विलासरावांनी विचारलं की तुमच्यात मुख्यमंत्री कोण होईल? त्यावेळी छगन भुजबळ, आर. आर. पाटील यांची नावं चर्चेत होती. पण आलेली संधी तेव्हा आपण चार खाती जास्त घेतली आणि आपण मुख्यमंत्री पद घेतलं नाही. ती संधी मिळाली असती तर ठामपणे सांगतो आजपर्यंत तुम्हाला राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री दिसला असता असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 

Google search engine