अजित पवारांच्या एन्ट्रीनं शिवसेनेत धुसफूस

20

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाने वर्षभरात दुसरा राजकीय भूकंप अनुभवला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis Govt) यांच्या सरकारमधील अजित पवारांच्या एन्ट्रीनं शिवसेनेत गोंधळ सुरू झाला आहे. सुनील तटकरे यांची कन्या आणि आमदार आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी राष्ट्रवादीकडून मंत्रीपदाची शपथ घेतली आहे, मात्र आता शिवसेनेने आदिती तटकरे यांच्यावर दंड थोपटले आहे.

आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री करण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. आदिती तटकरे यांना पालकमंत्री करू नये, अशी मागणी आमदार महेंद्र थोरवे यांनी उघडपणे केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही शिवसेनेच्या आमदारांनी आदिती तटकरे यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे काम शिवसेनेने केल्याचा आरोप आदिती तटकरे यांच्यावर करण्यात आला.

रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांच्याऐवजी भरत गोगावले यांना द्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या गटाकडे आता प्रत्येकी 9-9 असे 27 मंत्री आहेत. अजित पवार यांच्यासोबत शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अद्यापही खाते मिळालेले नाही. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना लवकरच खाती दिली जातील, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात आज बैठकही झाली आहे.

 

Google search engine