उलथापालथ करणाऱ्यांना योग्य जागा दाखवणार; शरद पवारांनी रणशिंग फुकले

13

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसमधील ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. यावेळी जमलेल्या समर्थकांना संबोधित करताना पवारांनी राजकीय लढाईचे रणशिंग फुंकले आहे. ‘राज्यात राजकीय उलथापालथ घडवून आणणाऱ्या प्रवृत्तींना महाराष्ट्रातील सामान्य माणूस त्यांची योग्य जागा दाखवेल,’ असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

यशवंतराव चव्हाण यांच्या प्रितीसंगम येथील स्मृतीस्थळावरून बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘राज्यांतील सरकारे पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेशातही आहे. चुकीच्या प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत. छत्रपती शिवराय, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातही याच प्रवृत्तींनी हा प्रकार सुरू केला आहे.

लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या पक्षाला धक्का देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांना देशात जातीय हिंसाचार वाढवायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ घडवून आणली आहे. तुमचे काही सहकारी या प्रवृत्तींना बळी पडले आहेत. पण ठीक आहे, एखादी व्यक्ती बळी पडेल, पण या महाराष्ट्रातील सामान्य माणूस एक वेळ उपाशी राहील, पण या महाराष्ट्राची सामूहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही आणि या शक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील उलथापालथ घडवणाऱ्यांना योग्य जागा शिवाय राहणार नाही. या गोष्टीसाठी फारशी जागा उरलेली नाही. वर्ष-सहा महिन्यात ही जागा निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिली जाईल, अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे.

‘यशवंतराव चव्हाणसाहेब आज नसले तरी त्यांनी दिलेला विचार तुमच्या हृदयात आहे. हा विचार पुढे नेण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे. महाराष्ट्रात आणि देशात आज लोकांमध्ये संघर्ष निर्माण करण्याची काळजी राज्यकर्ते घेत आहेत. महाराष्ट्र हे बंधुभाव वाढवणारे राज्य आहे. पण याच महाराष्ट्रात शाहू महाराजांच्या कोल्हापूर किंवा नांदेड, संगमनेर, अकोला या शहरांनी एकमेकांमध्ये वैर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या शहरांमध्ये जातीय दंगली झाल्या, हे महाराष्ट्राला शोभत नाही, असेही शरद पवार म्हणाले आहेत.

“राज्यातील सर्वसामान्य जनता, तरुण पिढी आणि कार्यकर्त्यांवर माझा मोठा विश्वास आहे. जनतेच्या पाठिंब्यावर पक्षाची पुनर्बांधणी करणे हा भविष्यातील माझा प्रमुख कार्यक्रम असेल, असेही शरद पवार म्हणाले. अजित पवार तसेच खुद्द शरद पवार यांच्या अतिशय निकटच्या मानल्या जाणाऱ्या काही नेत्यांनीच मोठे बंड केलं आहे, अशा स्थितीत थोरले आणि धाकटे पवार या दोघांमधील लढत कडवी होण्याची चिन्हे आहेत.

 

Google search engine