फडणवीसांची चतुर राजकीय खेळी; देशमुख यांच्या राजकीय भवितव्याचे काय?

17

नागपूर : दक्षिण-पश्चिम मतदारसंघात आपला तगडा प्रतिस्पर्धी होऊ नये म्हणून पक्षश्रेष्ठींवर कठोर टीका करणाऱ्या आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी चतुरस्त्र राजकीय खेळी केली आहे.

देशमुख यांनी रविवारी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानिमित्ताने मार्च महिन्यात झालेल्या पुणे जिल्ह्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील (Kasba Constituency)पोटनिवडणुकीची आठवण झाली. या निवडणुकीत बालेकिल्लामध्येच काँग्रेसने (Congress) भाजपचा पराभव केला. त्यावेळी देशमुख काँग्रेसमध्ये होते आणि या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी फडणवीस यांच्या नागपूरच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात कसब्याची पुनरावृत्ती होऊ शकते, असे विधान केले होते. त्यांचे विधान 2019 च्या विधानसभा निवडणुकीवर आधारित होते. त्यावेळी देशमुख यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवून मतांचे अंतर कमी केले होते. देशमुख यांची प्रतिक्रिया याला अनुसरून होती. आता फडणवीस यांनी देशमुखांना पुन्हा पक्षात आणून कसब्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता संपवली. यामुळे आता त्यांच्या विरोधात काँग्रेसला नवा उमेदवार शोधावा लागणार असून, कुणबीबहुल या मतदारसंघात काँग्रेसच्या विरोधात भाजप देशमुखांचा वापर करण्याची शक्यता आहे. पण देशमुखांच्या राजकीय भवितव्याचे काय? असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचे उत्तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि स्वतः फडणवीस यांनी पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात दिले.

देशमुख पक्ष सोडणार नाही, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार आहेत, असे सांगून देशमुख यांच्या कामाची भविष्यातील दिशा काय असेल, हे या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजप केवळ देशमुखांचा वापर करणार की त्यांच्या राजकीय भवितव्याला उभारी देणार, हे येणारा काळच सांगेल. देशमुख यांच्या भाजप प्रवेशामुळेच दक्षिण-पश्चिममध्ये कसब्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता संपुष्टात आलेली आहे, हेच देशमुखांच्या भाजप प्रवेशाचे फलित आहे.

Google search engine