मुंबई : विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांच्या शिंदे गटात प्रवेश झाल्याने ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात. ठाकरे गटाचे अंबादास दानवे (Ambadas Danwe) यांचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादी दावा करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ठाकरे गटाच्या विधानपरिषदेतील जागांची संख्या कमी होत असल्याने अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी काल (१८ जून) शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. ठाण्यातील आनंदाश्रम येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनीषा कायंदे यांची सचिवपदी नियुक्ती केली.
विधानपरिषदेची गणितं कशी बदलली?
आधी विप्लव बजौरिया आणि मग मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जागा कमी झाल्या आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या 9 झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या देखील 9 आहे. सध्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. जर राष्ट्रवादीने दावा केला तर त्यांचं पद जाऊ शकतं. एकीकडे अजित पवार हे विधासभेचे विरोधी पक्षनेते आहेत, म्हणजेच हे पद राष्ट्रवादीकडे आहे, त्यात आता विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीने दावा केला तर ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात.
…तर काँग्रेसकडूनही विरोधी पक्षनेतेपदावर दावा?
शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीत एकत्र आहेत. त्यात शिवसेनेच्या आमदार नीलम गोर्हे या उपसभापती आहेत. विरोधी पक्षनेतेपदही ठाकरे गटाकडे आहे. सध्या ठाकरे गटाकडे 9, राष्ट्रवादीकडे 9 तर काँग्रेसकडे 8 जागा आहेत. विधान परिषदेत पाच अपक्ष आमदार आहेत. त्यामध्ये किशोर दराडे यांनी ठाकरे यांना तर सत्यजित तांबे यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे संख्याबळ 10 तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संख्याबळ 9-9 इतके आहे. दराडेंनी पाठिंबा बदलला तर मात्र गेम बदलू शकतो. त्यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यास दावा करता येईल. ठाकरे विरोधी पक्षनेते आणि उपसभापती असल्याने राष्ट्रवादीच नव्हे तर काँग्रेसही दावा करू शकते. महाविकास आघाडीत सध्या मतपरिवर्तन झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत विरोधी पक्षनेतेपद कोणीही सोडणार नाही, त्यामुळे संख्याबळ कोणाकडे असेल, हे पाहावे लागेल.