पत्रकाराचा जाहीर सन्मान ही परिवर्तनाची सुरुवात

व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांचा नागरी सत्कार सोहळा

61
voice of media
voice of media

बुलडाणा : आपण आजपर्यंत अनेक सत्कार (felicitation) सोहळे पाहिले. परंतु पत्रकाराचा नागरी सत्कार होणे ही बाब दुर्मिळ आहे. आजचा हा सोहळा सकारात्मक पत्रकारीतेचा (Journalism) परिपाक आहे. एका पत्रकाराचा जाहीर सन्मान होणे ही परिवर्तनाची सुरुवात आहे, असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार, लेखक, संपादक चंद्रकांत वानखडे यांनी काढले. पत्रकारांची देशातील सर्वांत मोठी संघटना असलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार अनिल म्हस्के यांचा बुलडाणेकर व पत्रकार मंडळीच्यावतीने भव्य नागरी सन्मान करण्यात आला. यावेळी तो बोलत होते.

बुलडाणा अर्बन मुख्यालयासमोरील गोवर्धन इमारतीमधील प्रशस्त सभागृहात पत्रकारीच्या इतिहासातील पहिला आणि भरगच्च उपस्थितीने अविस्मरण ठरणारा हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक चंद्रकांत वानखडे, व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे तसेच खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार श्वेताताई महाले, आमदार धीरज लिंगाडे, शेतकरी नेते रविकांत तुपकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, प्रभुकाका बाहेकर, ओम राजपूत, पोलिस उपअधीक्षक गुलाबराव पाटील यांची मंचावर उपस्थिती होती.

पुढे बोलताना चंद्रकांत वानखडे म्हणाले की, पत्रकारांच्या वेदना प्रचंड आहेत. त्याला वाचा फोडण्याचे काम व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून संदीप काळे व अनिल म्हस्के करत आहेत आणि यापुढेही करतील. सध्या देशात द्वेषाचे राजकारण केले जात आहे. अशात पत्रकारांनी आपली निर्भिडता जपली पाहिजे. लोकांनी व पत्रकारांनी या द्वेषाच्या राजकारणाला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्र गिताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्तावितात सिद्धेश्वर पवार यांनी अनिल म्हस्के यांचा सत्कार हा बुलडाण्यातील तमाम पत्रकारांचा सत्कार असल्याचे नमूद केले. सन्मानपत्राचे वाखन ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांनी केले. यावेळी अनिल म्हस्के यांचा यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र आणि चांदीचा पेन देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन गजानन धांडे यांनी तर अरुण जैन यांनी आभार व्यक्त केले.

माणुसकी जपणारा पत्रकार : बुधवत

शिवसेना जिल्हाप्रमुख बुधवत म्हणाले, अनिल म्हस्के हे पत्रकारितेच्या पलीकडे माणुसकी जणारे व्यक्ती आहेत. म्हस्के यांनी बुलडाण्यात पत्रकारांसाठी अहोरात्र काम केले. त्यांचे कार्य कोरोनाच्या काळात दिसले. व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आता त्यांचे कार्य निश्चितच देशपातळीवर पोहोचेल.

मातीशी नाळ जुळलेला माणूस : सपकाळ

पत्रकारीता क्षेत्रात आपला वेगळा दरारा निर्माण करण्याचे काम अनिल म्हस्के यांनी केले आहे. मातीशी नाळ जुळलेला हा माणूस आहे. कितीही यश मिळाले तरी म्हस्के हे ‘डाऊन टू अर्थ’ व्यक्तिमत्व असून ते एक चांगले मित्रच नव्हे तर बंधू आहेत. पत्रकारितेच्या पलीकडे जात त्यांनी अनेकांशी प्रेमाचे नाते जपले त्यामुळे आज त्यांच्या सन्मानाला एवढी मोठी गर्दी उसळली, असे गौरवोद्गार यावेळी सपकाळ यांनी काढले.

वेगळा ठसा उमटविणारे बंधु : तुपकर

अनिल म्हस्के आपल्यासाठी ज्येष्ठ बंधुसारखे आहेत. पत्रकारितेसोबतच अनेक क्षेत्रात त्यांनी वेगळा ठसा उमटविला आहे. कोरोना महासाथीनंतर पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक बदल झाले. हे आव्हान पेलत म्हस्के यांनी पत्रकारांच्या हितासाठी व्यापक लढा दिला. बुलडाणा, अकोला, वाशिम या तीन जिल्ह्यात अनेक पत्रकार घडविण्याचे काम अनिल म्हस्के यांनी केले. पत्रकारांच्या पाठिशी राहून त्यांना कायम आधार देण्याचे ते आधारवड ठरले आहेत, असे मत रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले.

प्रभावी कामाचे धनी : आ. लिंगाडे

प्रभावीपणे काम करणारे पत्रकार अशी ओळख असलेले अनिल म्हस्के पत्रकारितेच्या क्षेत्रात कुणाचीही भीड न बाळगता प्रभावीपणे काम करणारे व्यक्ती असल्याचे गौरवोदगार आमदार धीरज लिंगाडे यांनी काढले. त्यांची व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे पत्रकार व पत्रकारितेला नवा आयाम मिळेल असेही ते म्हणाले.

आपल्या व्यक्तीचा सत्कार : बोंद्रे

केवळ पत्रकार म्हणुनच नव्हे तर एक चांगले मित्र म्हणून अनिल म्हस्के यांच्याशी आपला परिचय आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार हा आपल्या माणसाचा सत्कार असल्याची भावना व्यक्त करीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्र यांनी म्हस्के यांना भावी वाटचालीसाठी शुभकामना दिल्या.

निर्भिडता दाखवून दिली : खा. जाधव

प्रेमाच्या व्यक्तीचा सत्कारा होताना पाहुन आपण भारावून गेलोय. निर्भिड पत्रकारिता काय असते ते आपल्याला बुलडाण्यातील एका पत्रकाराने दाखवून दिले आहे. हे नाव अनिल म्हस्के यांचे असल्याचे खासदार प्रतापराव जाधव म्हणाले. म्हस्केंसारख्या व्यक्तींमुळे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ अभेद्य राहिल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बुलडाण्याचा डंका देशात : डॉ. शिंगणे

व्हॉईस ऑफ मीडियासाठी काम करताना अनिल म्हस्के यांच्या नावाचा डंका केवळ राज्यातच नव्हे तर देशात गाजेल असा ठाम विश्वास आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला. माहिती व जनसंपर्क मंत्रालय थेट मुख्यमंर्त्यांच्या अखत्यारित येते. त्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्राला कुणी सामान्य समजू नये. त्यात प्रचंड शक्ती आहे आणि ही शक्ती सकारात्मक पद्धतीने पत्रकारांच्य कल्याणासाठी वापरण्याचे काम अनिल म्हस्के करतील, यात शंका नाही, असेही त्यांनी सांगितले.

सकारात्मक पत्रकारिता व्हावी : चांडक

आजच्या युगात टीआरपीसाठी काहीही दाखविणे सुरू झाले आहे. अशात प्रिंट मीडियाचे अस्तित्व अबाधित आहे. त्यामुळे सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केले. व्हॉईस ऑफ मीडिया आणि अनिल म्हस्के यांच्या प्रयत्नातून पत्रकारांचे प्रश्न निश्चित सुटतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गौरवगाथेच्या सन्मानाचा आनंद : संदीप काळे

अनिल म्हस्के यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून आतापर्यंत पत्रकारांच्या हितासाठी केलेल्या कामाचा पाढाच व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी वाचून दाखविला. व्हॉईस ऑफ मीडियाला कोणतेही उपक्रम राबवायचे झाल्यास ते सर्वांत प्रथम बुलडाण्यात राबविले जातात. त्यानंतर या प्रकल्पांचा ‘बुलडाणा पॅटर्न’च्या धर्तीवर देशभरात राबविण्यात येते असा गौरवपूर्ण उल्लेख काळे यांनी केला. अनिल म्हस्के यांचे कार्य पाहता त्यांना केंद्रीय ‘कोअर टीम’मध्ये घेण्यात येईल अशी घोषणाही यावेळी त्यांनी केली.

सन्मान लढण्याचे दुप्पट बळ देणारा ठरला : अनिल म्हस्के

बुलडाण्याच्या इतिहासात प्रथमच एखाद्या पत्रकाराचा नागरी सत्कार होत आहे. त्यातही तो सत्कार माझा होतोय ही माझ्यासाठी प्रचंड अभिमानाची बाब आहे. सत्कार, सन्मान स्विकारण्याची माझी इच्छा नव्हती पंरतु आपल्या माणासांनी पाठीवरून मायेचा हात फिरविल्याची भावना जाणवल्याने बुलडाणेकरांच्या नागरी सत्काराला पाठ दाखविता आली नाही. तो स्वीकारावरच लागला. या सत्कारामुळे मला पत्रकारांच्या हक्कासाठी लढण्याचे दुप्पट बळ मिळाले, असे भावनिक उद्गार व्हॉईस ऑफ मीडिया या देशव्यापी पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी काढले सत्काराला उत्तर देताना काढले. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘पुण्य नगरी’चे स्व. मुरलीधर बाबा शिंगोटे यांच्या परीस स्पर्शाने आपल्या आयुष्याचे सोने झाले. असे आयुष्यात दोनदा परीसस्पर्श आपल्याला झालेत. सुधीर चेके पाटील यांनी आपल्याला पत्रकारितेत आणले. अपघाताने पत्रकारितेत आलो असलो तरी पत्रकारितेच्या आपल्या कर्तव्यात कधीही कसूर केला नाही. कोरोनाच्या काळात पत्रकारांवर प्रचंड संकट आले होते. परंतु महाराष्ट्रातील ज्या नेत्यांना आजपर्यंत पत्रकारांनी घडविले त्यांनीही राज्यातील पत्रकारांकडे दुर्लक्ष केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी भरपूर लढा द्यायचा आहे. नागरी सत्कारामुळे आपल्याला हा लढा उभारण्यासाठी बळ मिळाले आहे, असे म्हस्के म्हणाले. हा नागरी सत्कार बघण्यासाठी आई-वडिल हयात नसल्याचे सांगताना म्हस्के यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.

पोवाड्यांनी भरले स्फूरण

कार्यक्रमापूर्वी शाहीर विक्रांत सिंह राजपूत यांनी सादर केलेल्या पोवाड्यांनी सभागृहात स्फुरण भरले. त्याला
ढोलकीवर पेटीवर करणसिंह राजपूत, ढोलकीवर अक्षयसिंह राजपूत, तबल्यावर निशांत राजपूत, कोरसने ऋषीकेश सुरळकर, ऋतुजा राजपूत यांनी साथ दिली. सत्कारादरम्यान अनिल म्हस्के यांच्या कार्यावर आधारित माहितीपटही दाखविण्यात आला.

Google search engine