पुणे : महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या (Maharashtra Board of Education) वतीने घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच एक जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एक जूनला दुपारी विद्यार्थ्यांना आपला निकाल (result) ऑनलाईन पाहता येणार आहे. याबाबत शिक्षण मंडळाने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, लवकरच तशी घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेत लावला होता. त्याचप्रमाणे यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल देखील वेळेत लावण्यासाठी बोर्डाच्यावतीने प्रयत्न करण्यात आले आहेत. दहावी बोर्डाच्या परीक्षा दोन ते पंचवीस मार्च या कालावधीत घेण्यात आल्या. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाची परिस्थिती असल्याने यंदाच्या परीक्षा या महत्त्वाच्या ठरल्या आहेत.
15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या लेखी परीक्षा या दोन ते पंचवीस मार्च या कालावधीत संपन्न झाल्या. यंदा दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 77 हजार 256 मुलांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये 8 लाख 44 हजार 116 मुले तर 7 लाख 33 हजार 67 मुलींचा समावेश होता. मात्र गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थी संख्या कमी झाल्याचे निदर्शनास आले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या 61 हजार 708 विद्यार्थांनी कमी झाली आहे.