मुंबई : संसदेची (sansad) नवी इमारत बांधताना केंद्रातल्या मोदी (modi) सरकारने आम्हाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी उद्घाटन कार्यक्रमाला जाऊ नये अशी भूमिका घेतली. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
नव्या संसद भवनाचे (Parliament House) उद्घाटन उद्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. मात्र, हे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करावे, अशी मागणी काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्षांनी केली असून, या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. त्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगलेत.
शरद पवार म्हणाले की, आता संसदेची नवी वास्तू तयार झाली. मात्र, संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या उपस्थितीने होते, तशी पद्धत आहे. त्यामुळे या नव्या संसदेचे राष्ट्रपतींनी उद्घाटन करावे, अशी मागणी होती. ती ही त्यांनी मान्य केलेले नाही. उद्घाटनाचा कार्यक्रम ठरला, त्याचीही चर्चा कधी केलेली नाही. त्यामुळे कोणाला विश्वासात न घेता असे कार्यक्रम घ्यायचे असतील, तर विरोधी पक्षांनी त्या कार्यक्रमाला जाऊ नये अशी भूमिका घेतली. त्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे. असेही पवार म्हणाले.