चंद्रपूर (chandrapur) : सावली तालुक्यातील बोरमाळा, चेक विरखल आणि वाघोलीबुटी या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाघाने धुमाकूळ घालून चार जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी वनविभागावर तीव्र रोष व्यक्त करून वाघाला जेरबंद करण्याची मागणी लावून धरली. दरम्यान नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी वनिवभागाने या परिसरात पन्नास ट्रॅप कॅमेरे, पाच पिंजरे आणि शंभर वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहे.
सावली तालुक्यात वाघाने धुमाकूळ घालून चार जणांचा बळी घेतला आहे. तेव्हापासून वाघाला जेरबंद करण्याची मागणी करण्यात येत होती. ३० मार्चला बोरमाळा येथील हर्षल काळमेघे हा चार वर्षीय बालक घराशेजारी शौचाला बसला होता. तेव्हाच वाघाने त्याला उचलून नेत ठार केले. १८ एप्रिल रोजी चेक विरखल येथील मंदाबाई सिडाम या महिलेवरही वाघाने हल्ला करून ठार केले. तसेच २६ एप्रिल रोजी ममता बोदलकर या वृद्ध महिलेसही वाघाने ठार केले. या घटना ताज्या असतानाच उपवन क्षेत्र व्याहाडखुर्द अंतर्गत वाघोलीवडी येथील प्रेमिला रोहनकर हिच्यावरही वाघाने हल्ला केला.
सातत्याने वाघाचे हल्ले वाढत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मृतदेह न उचलण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे परिस्थिती चिघळण्याच्या मार्गावर आली होती. दरम्यान गावकऱ्यांचा तीव्र रोष बघता वनविभागाने नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह उचलण्यात आला. वाघाला जेरबंद करण्यासाठी सावली परिसरात वनविभागाने ५० ट्रॅप कॅमेरे, ५ पिंजरे आणि शंभर वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहे. वाघाच्या हालचालींवर वनविभाग बारीक लक्ष ठेवून असून लवकरच वाघाला जेरबंद करण्यात येईल असा विश्वास वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.