कोराडी वीज प्रकल्पावरून राजकारण तापणार! आदित्य ठाकरे नागपूर दौऱ्यावर

14

नागपूर : कोराडी औष्णिक वीज केंद्रातील प्रस्तावित 660 मेगावॅटच्या दोन वीज युनिटला नागपूरच्या स्थानिकांनी विरोध केला आहे. या वादात आमदार आदित्य ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. आदित्य ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर येणार असून काही वेळातच ते नागपूरला रवाना होणार आहेत.

नागपुरातील हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) स्थानिक पर्यावरणप्रेमींशी या विषयावर चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. कोराडीतील नांदगाव, वरदा या गावांनाही ते भेट देणार आहेत. ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी (Farmer) संवाद साधणार आहेत.

दरम्यान, याआधीही आदित्य ठाकरे यांनी दोनवेळा कोराडी आणि खापरखेडा वीज प्रकल्पाची पाहणी केली होती. वीज प्रकल्पांतून निघणारा धूर आणि राखेमुळे पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन या प्रकल्पांचे राखेचे बंधारे बंद करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते. विशेष म्हणजे या प्रकल्पांचा त्यांनी शेवटपर्यंत पाठपुरावाही केला.

त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा सत्तापरिवर्तन झाले आणि कोराडी वीज युनिटची मागणी पुन्हा वाढू लागली. मात्र स्थानिकांनी त्याला पुन्हा विरोध केला. स्थानिकांच्या आंदोलनात शेतकरी, ग्रामस्थ व शहरी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आदित्य ठाकरे यांनीही या वीज प्रकल्पासाठी जनसुनावणीला विरोध केला आहे.

या सर्व गोंधळात आणि आदित्य ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांचे होर्डिंग नागपुरातील रामटेक परिसरात लावण्यात आले आहे. नागपुरातील युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी हे होर्डिंग लावल्याचे बोलले जात आहे. या होर्डिंग्जवर आदित्य ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख आहे.

Google search engine