विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय सेवा योजनेचा पुरस्कार वितरण सोहळा.
नागपूर (Nagpur) : राष्ट्रीय सेवा योजनेचे राष्ट्राच्या विकासात मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी (Dr. Subhash Chaudhari) यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचा पुरस्कार वितरण सोहळा महाराज बाग स्थित छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरातील दीक्षांत सभागृहात सोमवार, दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडला. या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना कुलगुरू डॉ. चौधरी बोलत होते.
पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, अधिसभा सदस्य दिनेश शेराम, रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना कुलगुरू डॉ. चौधरी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वरूप प्रसंगानुसार तसेच गरजेनुसार बदलले पाहिजे, असे सांगितले. समाजपयोगी नवीन उपक्रम तयार करण्यासाठी वातावरण निर्मिती केली पाहिजे. कौशल्य विकास, शेती विषयक मार्गदर्शन, हस्तकला, उद्योजकता विकास आदीबाबत समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी, असे वातावरण तयार करण्याचे आवाहन कुलगुरू डॉ. चौधरी यांनी केले. तळागाळातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा या दृष्टिकोनातून रासेयोने काम करावे. वैद्यकीय सुविधा कौटुंबिकदृष्ट्या समाजाला मिळाव्या म्हणून मदत करावी. गाव पातळी, महाविद्यालयीन स्तरावर या सर्व घटकांचा विस्तार करणे आवश्यक असल्याचे कुलगुरू म्हणाले. यावेळी सर्व पुरस्कार प्राप्त स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी व प्राचार्यांचे कुलगुरूंनी अभिनंदन केले. यावेळी प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी सर्व पुरस्कारकर्त्यांचे अभिनंदन केले.
प्रास्ताविक करताना रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांनी विद्यापीठाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या जात असल्याचे सांगितले. जिल्हानिहाय वेगवेगळे कार्यक्रम रासेयोच्यावतीने राबविले जात आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व रासेयोची बांधिलकी व महत्त्व याविषयी माहिती दिली. केंद्र व राज्य सरकारच्या विविध उपक्रमांची योजनांची अंमलबजावणी रासेयोच्या माध्यमातून होत असल्याचे सांगितले. रासेयो ही संघटना भविष्यकालीन दृष्टीने भारतासाठी अत्यावश्यक व भूषणावह असल्याचे डॉ. पिसे म्हणाले. यावेळी ‘माझी माती माझा देश’ अभियान अंतर्गत कलशमध्ये माती टाकत उपक्रमाचे महत्व वाढविले. सोहळ्याचे संचालन करीत आभार प्रकाश शुक्ला यांनी मानले.
पुरस्कार देऊन सन्मान
विद्यापीठस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये स्वयंसेवक गटात नागपूर येथील शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेचा मनीष कडूकर, नागपूर शंकरनगर येथील एलएडी कॉलेजची कोमल नागरूकर, समर्थ महाविद्यालय लाखनी येथील चंद्रहास खंडारे, एनएमडी कॉलेज गोंदिया येथील निखिल बनसोड आदी स्वयंसेवकांचा कुलगुरूंच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम अधिकारी श्रेणीमध्ये डॉ. एन. के. उमाठे कॉलेजचे डॉ. विनोद खेडकर, ताईगोलवलकर महाविद्यालयाचे डॉ. चंद्रमोहन सिंह, जे. एम. पटेल कॉलेज भंडारा येथील डॉ. भोजराज श्रीरामे, डी. बी. सायन्स कॉलेजचे डॉ. गुणवंत गाडेकर, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे डॉ. हेमंत मिसाळ आदी कार्यक्रम अधिकाऱ्यांचा कुलगुरूंच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालय श्रेणीमध्ये डॉ. एन. के. उमाठे कॉलेज, ताईगोलवलकर महाविद्यालय, जे. एम. पटेल कॉलेज भंडारा, डी. बी. सायन्स कॉलेज व न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज आदी महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा सत्कार करण्यात आला.