आंदोलनामुळे कार्यालयासमोर वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात.
हिंगोली (Hingoli) : मराठा आरक्षणाचा (Maratha Aarakkshan) प्रश्न संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडावा यासाठी शिवसेना (ठाकरेगट) पदाधिकाऱ्यांनी शिवसेना खासदार (शिंदेगट) हेमंत पाटील यांच्या हिंगोलीतील कार्यालयासमोर सोमवारी भजन आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
हिंगोली येथील कार्यालयासमोर आयोजित भजन आंदोलनात शिवसेना (ShivSena) जिल्हा प्रमुख विनायक भिसे, जी. डी. मुळे औंढा तालुका प्रमुख गणेश देशमुख, आनंदराव जगताप, संतोष सारडा, अक्षय देशमुख, सोपान बोंढारे, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विविध ठिकाणी आंदोलन होत आहेत. शासनाला एक महिन्याचा कालावधी मागितला असला तरी ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरु आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या शिवाय हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष शिल्लक असतांनाही खासदार पाटील यांनी उमरखेड भागात बंधारे मंजूर करून घेतले. त्या भागात त्यांनी घेतलेल्या कारखान्याला जास्तीत जास्त ऊस मिळावा या स्वर्थापोटी यांनी हे बंधारे मंजूर करून घेतल्याचा आरोप केला आहे. खासदार पाटील यांनी हिंगोलीच्या कयाधूनदीवर बंधारे मंजूर करण्याकडे लक्ष द्यावी अशी मागणी करण्यात आली. खासदार पाटील यांनी मागील साडेचार वर्षात जनतेची कामे मार्गी लावली नसल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी खासदार पाटील यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली. सकाळी 11 वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी साडेबारा वाजता संपले. या आंदोलनामुळे आज खासदार पाटील यांच्या कार्यालयासमोर वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.