परळी वैजनाथ गणेश मंडळाचा अनोखा उपक्रम
नागपूर (Nagpur) : मराठवाड्यातील परळी वैजनाथ येथील गणेश मंडळासाठी येथील मूर्तीकाराने तीन हजार नारळाची गणेशमूर्ती तयार केली आहे. 12 फूट लांब आणि 10 फूट रुंद गणेशमूर्तीमध्ये नारळाशिवाय इतर कोणत्याही वस्तूचा वापर करण्यात आलेला नाही.
गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे तसतसे मूर्तींना अंतिम रूप देण्यात मूर्तीकार व्यस्त आहेत. मध्य भारतातील सर्वात मोठी मूर्तीकारांची बाजारपेठ नागपुरात आहे. नागपूरच्या चितार ओळीत मूर्तीकार मूर्तींना वेगवेगळे आकार देत आहेत. गणेश उत्सव 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
नारळाची ही मूर्ती परळी वैजनाथ मंदिर ट्रस्टसाठी तयार केली आहे. सुमारे 20 दिवस 24 तास काम करून मूर्ती तयार केली आहे. मूर्तीची लांबी 12 फूट आहे. तर रुंदी 10 फूट आहे. नारळाची मूर्ती साकार करणे हे मोठे आव्हान होते. पण गणेशाच्या आशीर्वादाने आव्हान लिलया पेलत मूर्ती साकार करण्यात आली. मूर्तीसाठी विविध प्रकारचे नारळ वापरण्यात आले.
काही लहान तर काही मोठे नारळ घेतले. तसेच काही ठिकाणी नारळाच्या सालीचाही वापर करण्यात आला आहे. अगदी श्रीगणेशाचे डोळेही नारळापासून केले आहे. पर्यावरणपूरक अशी ही गणेश मूर्ती आहे.
नारळाच्या गणेशमूर्तीमध्ये भारतातील प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरातील श्रीगणेशाला अर्पण केलेला 6 नारळाचा प्रसाद वापरला आहे. प्रत्येक हातात एक नारळ, प्रत्येक पायात एक नारळ गणेशाच्या पोटात एक असे नारळ वापरले आहे. नागपुरात असलेल्या चितारओळीतील मूर्ती परदेशातही जातात. तसेच इथून अनेक राज्यांत मूर्ती जातात. या बाजारपेठेतून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड अशा अनेक ठिकाणी मूर्ती जातात. या बाजारात 5 इंचापासून 21 फूट गणेशमूर्ती तयार केल्या जातात.