कायदेतज्ज्ञांचा विश्वास, म्हणाले, ‘आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले’
नवी दिल्ली (New Delhi) : सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज महाराष्ट्राच्या दोन सलग सुनावण्या आहेत. पहिली पक्ष आणि चिन्हांसंदर्भात याचिका आहे तर दुसरी आमदार अपात्रतेबाबतची याचिका आहे. यामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना शिवसेना (ShivSena) पक्ष आणि चिन्ह पुन्हा मिळू शकते, असा विश्वास कायदेतज्ज्ञ सिद्धर्थ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाचे मत महत्त्वाचे असल्याचे सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटले आहे.
आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणी सोबतच विधानसभा अध्यक्षांविरोधातील याचिकेचीही सुनावणी होणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना देण्यात आला आहे. त्यात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करणार नसल्याचे सिद्धार्थ शिंदे म्हणाले. विधानसभा अध्यक्ष उत्तर देण्यासाठी वेळ मागू शकतात किंवा मी सुनावणी सुरू केली असल्याचेही न्यायालयाला सांगू शकतात, असे मतही शिंदे यांनी व्यक्त केले.
शिवसेना नाव आणि चिन्ह मिळण्याची अपेक्षा कायम
उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळण्याची शक्यता संपलेली नाही. अद्यापही उद्धव ठाकरे यांना शिवसेना नाव आणि चिन्ह मिळू शकते, असा विश्वास सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. चिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाचा होता. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. त्यानुसार आयोगाचा शिवसेनेबाबत जो निर्णय आहे तो घटनेच्या आधारे आहे का? ते तपासले जाईल आणि त्यानंतर काय तो निर्णय घेतला जाईल. मात्र तो निर्णय काय असेल हे आताच सांगता येणार नसल्याचे सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटले आहे.