शिंदेंनी आता OBC तरुणांचे उपोषण सोडवावे- विजय वडेट्टीवार

9
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar

ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री द्यावी !

मुंबई (Mumbai) : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे उपोषण सुटल्याचा आनंद आहे. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यभर फिरून ओबीसी (OBC) तरुणांचे उपोषण सोडवण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी गुरुवारी केली. मनोज जरांगे यांचे उपोषण सुटले याचा आम्हाला आनंद आहे. आता सरकारवर आरक्षणाच्या आश्वासनाची पूर्तता करण्याची जबाबदारी आहे. या प्रकरणी ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, याची ग्वाही देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, जिथे ओबीसी तरुण उपोषणाला बसले आहेत, तिथंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जावे आणि उपोषण सोडवावे. जागोजागी जावून उपोषण सोडवणे आणि आंदोलन थांबवणे हेच काम सरकरच राहिले आहे. जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठीचे उपोषण आजअखेर थांबवण्यात राज्य सरकारला यश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी जावून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आपल्या हस्ते सोडवले. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन केले आहे.

आरक्षण देण्याचीही सरकारची जबाबदारी

विजय वडेट्टीवार म्हणाले की, जरांगे हे समाजासाठी काम करतात, त्याकडे सरकारने आधीच लक्ष द्यायला हवे होते. त्यामुळे सरकारने उपोषण सोडवले असले तरी त्यात उशीर झाला आहे. जशी उपोषण सोडवण्याची जबाबदारी सरकारची होती तशीच आता मराठा समाजाला (Maratha Samaj) आरक्षण देण्याची जबाबदारीही सरकारची आहे आणि ती जबाबदारी सरकारने लवकर निभवायला हवी.

सरसकट ओबीसी प्रमाणपत्रास विरोध

विजय वडेट्टीवार म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाज विरोध करत नाही. मात्र मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध आहे. आता दीड वर्ष झाले आहे. निवडणुकीला आता काही 8 महिनेच शिल्लक आहे. त्याआधी देतात की, पुन्हा पाने पुसतात, हे पाहावे लागेल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Google search engine