फडणवीस मराठा आरक्षणाची जबाबदारी झटकण्याच्या प्रयत्नांत- नाना पटोले

7
Nana Patole
Nana Patole

शिंदेंसोबत न जाता फडणवीस राजस्थानला का गेले?

मुंबई (Mumbai) : शिंदेचे आमदार जर अपात्र ठरले तर फडणवीस मुख्यमंत्री होतील, त्यावेळी ते म्हणतील की एकनाथ शिंदेनी आश्वासन दिले होत, असे सांगून फडणवीस मोकळे होतील, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) टार्गेट केले आहे.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarakkshan) उपोषणाला बसलेले मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेट घेतली. त्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते, यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी फडणवीसांना लक्ष्य केले आहे.

नाना पटोले म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन देणारे देवेंद्र फडणवीस हे मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत न जाता राजस्थानला का गेले?. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले तर फडणवीस मराठा आरक्षणाची जबाबदारी झटकतील,अशी शक्यता पटोले यांनी व्यक्त केली आहे.

भाजपने जनतेला फसवले

नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने देशातील जनतेला फसवले आहे. 2014 साली नरेंद्र मोदी यांनी खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली व सत्तेत येताच आश्वासनांना हरताळ फासला. यवतमाळमध्ये ‘चाय पे चर्चा’ करताना मोदींनी भाजपाचे सरकार आले तर शेतकऱ्यांचा खर्च कमी करेन, उत्पन्न दुप्पट करेन व पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची करेन असे आश्वासन दिले होते. प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख देणार, दरवर्षी 2 कोटी रोजगार देणार अशी आश्वासने दिली आणि सत्तेत आल्यानंतर मात्र हा तर निवडणुकीतील ‘जुमला’ होता असे सांगून जनतेची फसवणूक केली. आता या भाजपाला असा ‘जुमला’ दाखवा की पुन्हा सत्तेत येणार नाहीत, असे आवाहन महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

निर्णय शिंदे गटाला घरी पाठवणारा असणार

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंबंधीच्या विधानसभा अध्यक्षांपुढील सुनावणीला गुरुवारी सुरुवात झाली. आजच्या सुनावणीत शिंदे गटाने ठाकरे गटावर दस्तऐवज देण्यात कसूर होत असल्याचा आरोप केला. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी 2 आठवडे लांबणीवर टाकण्यात आली. दरम्यान, ठाकरे गटाने या प्रकरणाचा फैसला शिंदे गटाला घरी पाठवणारा असेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. तसेच सध्या केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोपही केला.

Google search engine