बंगळुरू : आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील भाजपला (BJP) रोखण्यासाठी विरोधकांची बंगळुरू येथे बैठक होत आहे. या बैठकीत विरोधकांच्या महाआघाडीच्या नावावर चर्चा झाली आणि ‘INDIA’ या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या आघाडीला ‘INDIA’ असे नाव देण्याचा प्रस्ताव राहुल गांधी यांनी मांडला. सर्व पक्षांनी त्यास मान्यता दिली असून आगामी लोकसभा निवडणुका ‘INDIA’ या नावाने लढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी दिली.
विरोधकांचा सरकारवर निशाणा
बंगळुरूमध्ये जमलेल्या विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी म्हणाल्या, “ही चांगली आणि अर्थपूर्ण बैठक आहे. आजच्या चर्चेनंतरचा निकाल या देशातील लोकांसाठी योग्य असू शकतो.” तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेत बोलताना ‘आपण सर्वजण मिळून भाजपचा पराभव करू’, असा विश्वास व्यक्त केला.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुग खरगे म्हणाले की, काँग्रेसला सत्ता किंवा पंतप्रधानपदात रस नाही. आपली राज्यघटना, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय यांचे रक्षण करण्याचा आमचा मानस आहे. तसेच राज्य पातळीवर विरोधी पक्षांमध्ये मतभेद आहेत. मात्र हे मतभेद विचारधारेशी संबंधित नाहीत, असे खरगे यांनी स्पष्ट केले.