राष्ट्रवादीचे बंडखोर शरद पवारांच्या भेटीला; तर्क-वितर्कांना उधाण

46

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटानं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीमुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अजित पवार गटाच्या 30 आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. या आमदारांनी तासभर शरद पवारांशी चर्चा केली. सलग दुसऱ्या दिवशी अजितदादा गटाने शरद पवार यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मीडियाशी संवाद साधला.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार आशीर्वाद घेण्यासाठी, दर्शनासाठी आम्ही आम्ही चव्हाण सेंटरला आलो होतो. काल रविवार असल्याने शरद पवार यांची भेट घेता आली नाही. आजपासून विधीमंडळाचं अधिवेशन (Legislative session) सुरू झाल्याने अनेक आमदार मुंबईत होते. केवळ मंत्रीच नव्हे तर इतरही आमदारांना शरद पवारांचे आशीर्वाद घ्यायचे होते, ती संधी आम्ही त्यांना मिळवून दिली आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

कालप्रमाणे आजची भेट पूर्वनियोजित नव्हती. शरद पवार चव्हाण सेंटरला येणार असल्याची माहिती काढली. त्यामुळे आम्ही इथे आलो. सर्वांनी शरद पवार यांची भेट घेतली. पक्ष एकसंघ राहावा अशी विनंती केली. पवारांनी शांतपणे सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांच्या मनात काय आहे हे मी आज कसं बोलू शकतो? असेही ते म्हणाले.

शरद पवार आमचे नेते

दरम्यान, शरद पवार हे आमचे नेते होते, आहेत आणि राहतील, असे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले. दरम्यान, शरद पवार गटाकडून या भेटीबाबतची कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे या भेटीत आणखी काय घडलं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Google search engine