30 सप्टेंबरला आष्टी शहीद ते कौंडण्यपूरपर्यंत काढणार पदयात्रा.
नागपूर (Nagpur) : विदर्भ राज्य आंदोलन समितीने ‘विदर्भ मिळवु औंदा’ या कार्यक्रमाअंतर्गत 31 डिसेंबर 2023 पर्यत स्वतंत्र विदर्भ मिळवण्याकरीता ‘करु किंवा मरु किंवा जेलमध्ये सडू’ अशी घोषणा केली आहे. वेगळा विदर्भ मिळवण्यासाठी 28 सप्टेंबरला विदर्भवाद्यांकडून नागपूर कराराची होळी करण्यात येणार असून 30 सप्टेंबरला आष्टी शहीद ते कौंडण्यपूरपर्यंत पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप (Adv. wamanrao Chatap) यांनी येथे दिली.
या आंदोलनात महिलांचा सक्रिय सहभाग वाढवून आंदोलन तीव्र करुन घटनेतील कलम ३ प्रमाणे केंद्र सरकारला स्वतंत्र विदर्भ राज्याची ११८ वर्षांची मागणी कायमस्वरूपी निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी वर्धा येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत २८ सप्टेंबर २०२३ रोजी विदर्भातील जनतेसाठी अन्यायकारक असणाऱ्या नागपूर कराराची होळी जिल्ह्या जिल्ह्यात करण्याचा निर्णय घेतला असून नागपूर शहरात व्हेरायटी चौकात होळी केली जाणार आहे.
भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईचे प्रतिक असलेले आष्टी (शहीद) जिल्हा वर्धा येथून ३० सप्टेंबर रोजी विदर्भ निर्माण संकल्प पदयात्रा सकाळी ११ वाजता सुरु होणार असून ती आष्टी ते तळेगाव व तळेगाव येथे मुक्काम करणार आहे. दुसऱ्या दिवशी १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता तळेगाव येथून निघून रस्त्यातील गावात विदर्भाचा जागर करीत रात्री आर्वी येथे मुक्कामी राहणार आहे. तिसऱ्या दिवशी २ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजता आर्विवरून निघून दुपारी १२ वाजता पदयात्रेचा समारोप कौंडण्यपूर येथे होणार आहे.
2 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता विदर्भ निर्माण संकल्प महिला मेळावा व महिलांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचे प्रतिक असलेल्या रुक्मिणीला साकडे घालून केंद्र सरकारला विदर्भ राज्य तत्काळ निर्माण करण्याची सद्बुद्धी दे अशी साद महिला मेळाव्यातून घालतील व “हमकोही इतनी शक्ती देना, जंग हम लढे” अशी घोषणा करतील व “भिवू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत’ असे पुरुष सत्याग्रही भावांना आवर्जून सांगतील. विदर्भातील आया बहिणींनी व जनतेनी उस्फुर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन विराआंस कार्यकारिणीने केले आहे. यावेळी प्रकाश पोहरे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, रंजना मामर्डे, अरुण केदार, मुकेश मासुरकर, विष्णुपंत आष्टीकर, प्रभाकर कोंडबत्तूनवार आदी उपस्थित होते.