आतापर्यंत गणेशाच्या 7177 मूर्तींचे विसर्जन; 3.22% मूर्ती पीओपीच्या, तर 96% मातीच्या.
नागपूर (Nagpur) : नागपूर महानगरपालिकेद्वारे(NMC) शहरात वेगवेगळ्या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात शहरात 7 दिवसांच्या गणपती बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन झाले. मनपाद्वारे व्यवस्था करण्यात आलेल्या विसर्जन टँकमध्ये आतापर्यंत एकूण 7177 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. विसर्जीत झालेल्या श्रीगणेशांच्या मूर्तींमध्ये पीओपीच्या मूर्तींचे प्रमाण हे 3.22 टक्के असून मातीच्या मूर्ती विसर्जनाचे प्रमाण 96.78 टक्के एवढे आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात शहरातील सर्व विसर्जन स्थळे व्यवस्थित कार्यरत आहेत. बुधवार 27 सप्टेंबरपासून 9, 10 आणि 11 दिवसांच्या श्रीगणेशाच्या मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. त्यादृष्टीने देखील मनपाची सर्व तयारी पूर्ण झालेली असून 4 फुटापर्यंतच्या मूर्ती शहर हद्दीमधील कृत्रिम विसर्जन टँकमध्ये तर 4 फुटापेक्षा मोठ्या आकाराच्या मूर्तींचे विसर्जन कोराडी येथील कृत्रिम तलावामध्ये करण्यात येणार आहे.
कोराडी येथील विसर्जन स्थळी देखील सर्व व्यवस्था पूर्णत्वास आली आहे. नागरिकांनी शांततापूर्ण रितीने सर्व विसर्जनस्थळी श्रीगणेशाच्या मूर्तींचे विसर्जन करावे, तसेच निर्माल्य कलशामध्येच श्रीगणेशाचे निर्माल्य जमा करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
बुधवारी 20 सप्टेंबर रोजी दीड दिवसांच्या श्रीगणेशाच्या विसर्जनापासून शहरात मूर्ती विसर्जनाला सुरूवात झाला. त्यानंतर 3 दिवस, 5 दिवस आणि 7 दिवसांच्या श्रीगणेशाच्या मूर्तींचे विविध ठिकाणी विसर्जन करण्यात आले. आतापर्यंत झालेल्या विसर्जनानुसार दीड दिवसांच्या श्रीगणेशाच्या 1274 मूर्तींचे, 3 दिवसांच्या श्रीगणेशाच्या 912 मूर्तींचे, 5 दिवसांच्या श्रीगणेशाच्या 2579 मूर्तींचे आणि 7 दिवसांच्या श्रीगणेशाच्या 2412 मूर्तींचे विसर्जन झाले. एकूणच आतापर्यंत एकूण 7177 मूर्तींचे विसर्जन झालेले असून यामध्ये 6946 मूर्ती मातीच्या, तर 231 मूर्ती पीओपीच्या आढळून आलेल्या आहेत.