कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा घाटच.

15
छ. संभाजीनगर
छ. संभाजीनगर

जिल्हयातील 100 हून अधिक शाळांचा समुह शाळांमध्ये होणार समावेश.

छ. संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar) : राज्याभरातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा उभारण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने काम सुरु केले असून याबाबतचे प्रस्ताव 15 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यातून राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात 20 पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या 14 हजार 783 शाळा बंद होण्याची भीती शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत असून, या शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 128 शाळांचा समावेश आहे.

युडाएसच्या आकडेवारी नुसार राज्यभरात 2021-2022 च्या आकडेवारीनुसार 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या सुमारे 14 हजार 783 शाळा सुरू असून त्यामध्ये 1 लाख 85 हजार विद्यार्थी शिकत आहेत. या शाळांमध्ये 29 हजार 707 शिक्षक कार्यरत आहेत. दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचावे . यासाठी सरकारने या शाळा सुरू केल्या होत्या. यातून शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्याचा प्रयत्न होता. मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिफारसीनुसार या शाळांचे रूपांतर समूह शाळांत केले जाणार आहे.

याला शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटनांनी विरोध केला आहे. समूह शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा दिल्या जातील, खेळ, संगीत, कला यांच्यासाठी शिक्षक मिळू शकतील, असा दावा सरकारकडून या निर्णयाचे समर्थन करताना केला जात आहे. तो फसवा असल्याचे संघटनांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाता यावे यासाठी सरकारी निधीतून किंवा सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे शिक्षण आयुक्ता उपसंचालकांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

Google search engine