सूर्य किरण एअरोबॅटिक टीम हॉक एमके 132 विमानाने दाखवणार ताकद.
श्रीनगर (Srinagar) : पहिल्यांदाच भारतीय वायुसेनेचा (IAF) एअर शो जम्मू एअर फोर्स स्टेशनवर होणार आहे. 22 सप्टेंबरपासून सुरू होणारा हा शो दोन दिवस चालणार आहे. जम्मू आणि काश्मीरचे (Jammu & Kashmir) भारतात विलीनीकरण झाल्याची 76 वर्षे आणि जम्मू एअरफोर्स स्टेशनचा हीरक महोत्सव साजरा करण्यासाठी हा शो आयोजित करण्यात आला आहे.
या एअर शोमध्ये सूर्यकिरण एरोबॅटिक टीम हॉक एमके 132 विमानाने देशाची ताकद दाखवणार आहे. याशिवाय एअर वॉरियर ड्रिल टीम, गॅलेक्सी डेअरडेव्हिल स्काय डायव्हिंग टीम MI-17 हेलिकॉप्टरच्या प्रदर्शनासह आकाशात कामगिरी करतील.
भारतीय हवाई दलाचा एअर वॉरियर सिम्फनी ऑर्केस्ट्रादेखील या शोमध्ये सादर करेल. सुखोई फायटर जेट यात सहभागी होत नाहीये. सर्वसामान्यांनाही हा शो पाहता येणार आहे. 20 सप्टेंबर रोजी भारतीय हवाई दलाच्या जवानांनी या शोसाठी रिहर्सलही केली होती.
काय असेल खास शोमध्ये
सूर्यकिरण एअरोबॅटिक टीमचे विंग कमांडर सिद्धेश कार्तिक यांनी सांगितले की, हा 25 मिनिटांचा शो आहे. तो दोन भागांत सादर केला जाईल. पहिल्या भागात 9 विमानांसह वेगवेगळी फॉर्मेशन्स तयार केली जातील आणि वेगवेगळ्या युद्ध पद्धती असतील. हा भाग फ्लाइटची अचूकता दर्शवेल.
दुसऱ्या भागात, एअरोबॅटिक टीम स्वतःला लहान युनिट्समध्ये विभाजित करते आणि अधिक रोमांचक स्टंट करण्यासाठी जमिनीच्या जवळ येते. आधुनिक फायटर प्लेन काय करू शकते हे या स्टंट्सच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो.
गेल्या आठवड्यात जयपूरमध्ये एअर शो झाला
यापूर्वी 15 सप्टेंबर रोजी IAF च्या 9 हॉक विमानांनी राजस्थानच्या जयपूर येथील जलमहालवर अप्रतिम स्टंट दाखवले होते. सूर्यकिरण एरोबॅटिक टीमने सुमारे तासभर एअर शो केला. यामध्ये तीन पायलट जयपूरचे होते. जयपूर विमानतळावरून सर्व विमानांनी उड्डाण केले.