जालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( eknath shinde) व त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या संभाषणाचा वादग्रस्त व्हिडिओ खरा असेल, तर त्यांना ते खूप महागात पडेल, असा इशारा मराठा आरक्षणासाठी ( maratha aarakshan) गत 16 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (jarange) यांनी दिला आहे. मी उपोषणाची जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांना भेटण्यासाठी वेळ हवा होता. तो मी दिला, असेही ते यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या आंतरवाली जालना दौऱ्यावर भाष्य करताना म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी सायंकाळी मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला भेटण्यासाठी यावे. हरकत नाही. पण ते येणार किंवा नाही याची माझ्याकडे कोणतीही खात्रीलायक माहिती नाही. ते आले तर त्यांचे मराठा समाजाच्यावतीने आम्ही स्वागत करतो.
त्यांच्याशी आरक्षणावर चर्चा करू
आम्ही सरकारला मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेण्यासाठी 1 महिन्याचा वेळ दिला आहे. ते येथे आल्यानंतर आम्ही पुन्हा त्यांच्याशी मराठा आरक्षणावर चर्चा करू, असे जरांगे म्हणाले.
सरकारला हे खूप महागात पडेल
यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या व्हायरल व्हिडिओवरही प्रतिक्रिया दिली. बोलून मोकळे व्हायचेय की काही करायचे हे आम्ही पाहू. आम्ही आमची इच्छा नसतानाही तुम्हाला महिन्याभराचा वेळ दिला. अशी विधाने कुणीही करू नये. हा व्हिडिओ खरा असेल, तर सरकारला हे खूप महागात पडेल, असे ते म्हणाले.