नागपूरच्या काटोलमधील लसूण चोरी प्रकरण

फिर्यादीच निघाला चोर, 6 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त

31

नागपूर : ट्रकमध्ये लसणाचे 102 कट्टे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला तीन आरोपींनी चाकूचा धाक दाखवून सहा लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणात फिर्यादीच चोर निघाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या (local crime branch) पथकाने आरोपीला ताब्यात घेतले आहे. शब्बीर इस्माईल मोहम्मद (50, रा. ग्राम आलोद, जि. बुंदी राजस्थान) असे आरोपीचे नाव आहे.

9 सप्टेंबरला शब्बीर इस्माईल मोहम्मद हा आयसर ट्रक क्रमांक एचआर 55/ एएल 8306 मध्ये लसणाचे 102 कट्टे घेऊन वडचिचोली ते काटोलमार्गे जात असताना घुबडमेट टेकडी काटोल येथे काळ्या रंगाच्या पॅशन दुचाकीने आलेल्या तीन आरोपींनी शब्बीर इस्माईल मोहम्मद याला थांबविले. चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून रोख 13 हजार रुपये घेतले. दोरीने बांधून शब्बीर इस्माईल मोहम्मद याला झुडपात फेकून दिल्यानंतर लसणाचे 102 कट्टे असा एकूण 6 लाख 76 हजार रुपयांच्या मुद्देमालासह पसार झाले.

याप्रकरणी काटोल पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास केला. तपासा दरम्यान फिर्यादी शब्बीर इस्माईल मोहम्मद याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय बळावल्याने पोलिसी हिसका दाखविताच त्याने साथीदार पवन उर्फ गौरव मदनलाल मेवाडा (23, रा. डोकम श्रीरामनगर, रामदेव मंदिराजवळ आरएसएस ग्राउंड, ता. जि. कोटा राजस्थान) याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी शब्बीर इस्माईल मोहम्मद याला ताब्यात घेतले. आरोपींनी चोरलेले प्रत्येकी 50 किलो वजनाचे 100 कट्टे हे पवन मेवाडा याच्याजवळ ठेवल्याची माहिती दिली. आरोपीला पवन मेवाडाकडे घेऊन गेले असता त्याने ट्रकमध्ये शंभर कट्टे असल्याची माहिती दिली.

शब्बीर इस्माईल मोहम्मद याने माझ्या मोबाइलवर कॉल करून तीनधार येथे लसूण घेऊन जाण्याकरिता ट्रक घेऊन येण्यास सांगितले. शब्बीर इस्माईल मोहम्मदच्या सांगण्यावरून पवन तीनधार येथे ट्रक घेऊन गेला. ट्रकमधील 100 कट्टे घेऊन आल्याची माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पवन मेवाडा याच्या ताब्यातून 50 किलो वजनाचे 100 कट्टे व ट्रक असा एकूण 26 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमालासह दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीसाठी काटोल पोलिसांच्या स्वाधीन केले.

ही कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार व अपर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, एपीआय आशिषसिंग ठाकूर, पीएसआय आशिष मोरखेडे, एएसआय चंद्रशेखर घडेकर, एचसी नीलेश बर्वे, मयूर ढेकले, प्रमोद तभाने, रणजीत जाधव, चालक आशुतोष लांजेवार यांनी केली.

Google search engine