नागपूर : नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये (National People’s Court) ५६ हजार ८३१ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली आहे. या प्रकरणांचे एकूण तडजोड मूल्य १४३ कोटी रुपये आहे. जिल्हा न्यायालय, (District Court,) कौटुंबिक न्यायालय (Family Court), कर्ज वसुली न्यायाधीकरण (Debt Recovery Litigation), सहकार न्यायालय, औद्योगिक व कामगार न्यायालय (Industrial and Labor Court) आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश जे. पी. झपाटे, जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सचिन पाटील यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय लोकअदालतीत 23 घटस्फोट व कौटुंबिक वाद प्रकरणांतील पती-पत्नी यांच्यामध्ये आपसी समझोत्याने मनोमिलन होउन पुन्हा नव्याने सुखाचा संसार सुरू झाला. याशिवाय १५३ मोटार अपघात दाव्यांमध्ये तडजोड झाल्याने रुपये ९ कोटी ८ लाख नुकसानभरपाई प्राप्त झाली. तसेच बँक व वित्तीय संस्थाकडील १२५ प्रकरणामध्ये तडजोड होउन ८० कोटी ५७ लाखांची कर्ज वसुली झाली.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी दावे, भूसंपादन प्रकरणे, तडजोडीयोग्य फौजदारी प्रकरणे, वैवाहिक वाद, मोटार अपघात दावे, विद्युत अधिनियमाची प्रकरणे, पराक्रम्य लेख अधिनियम कलम १३८ ची प्रकरणे, कामगार वाद, रक्कम वसुली प्रकरणे आणि इतर दाखलपूर्व प्रकरणे समोपचाराने निपटारा करण्यासाठी ठेवण्यात आली होती. यात पक्षकारांची २९ हजार ९१३ प्रलंबित प्रकरणे व १ लाख १२ हजार ६४९ दाखलपूर्व अशी एकूण १ लाख ४२ हजार ५६२ प्रकरणे आपसी तडजोडीसाठी हाताळण्याकरीता एकूण ४८ पॅनल तयार करण्यात आले होते. पॅनलमध्ये न्यायिक अधिकारी व सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी, वकील व समाजसेवक यांचा समावेश होता.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. आर. पडवळ, जिल्हा न्यायाधीश श्रीमती एम. व्ही देशपांडे, दिवाणी न्यायाधीश डी. बी. म्हालटकर अॅड. सुष्मा नालस्कर, जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष रोशन बागडे तसेच जिल्हातील सर्व न्यायिक अधिकारी, अन्य पदाधिकारी व विधीज्ञ, पॅनल सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, विधी स्वयंसेवक तसेच जिल्हा न्यायालयीन कर्मचारी वर्ग, जिल्हा व तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार आदी राष्ट्रीय लोकअदालतच्या आयोजनात सहभागी झाले होते.