भंडारा: काँग्रेस (congres) नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( nana patole) हेच ओबीसी आणि मराठा या दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ओबीसी नेते डॉ. परिणय फुके ( parinay fuke ) यांनी केला. आज भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जालना येथे मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यानंतर जरांगे यांच्या भेटीला गेलेल्या वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाचे आरक्षण वाढवून मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करून मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचे समर्थन केले. त्यामुळे वडेट्टीवार यांच्या भूमिकेवर डॉ. फुके यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.
वडेट्टीवार यांचे जात प्रमाणपत्र तपासण्याची वेळ आल्याचे फुके यावेळी म्हणाले. दरम्यान, वडेट्टीवार यांना ओबीसी समाजाची वकिली करण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवालही फुके यांनी केला. वडेट्टीवार यांनी वेळीच त्यांची भूमिका न बदल्यास त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा डॉ. फुके यांनी दिला.